शीना बोरा जिवंत? हत्या झालीच नाही?

कॉर्पोरेट जगतासह सगळ्यांनाच हादरवून टाकणाऱ्या शीना बोरा मर्डर मिस्ट्री प्रकरणात आता आणखी एक ट्विस्ट आलाय. कारण, आपली मुलगी शीना बोरा हिचा खून झालाच नसल्याचा दावा तिची आई इंद्राणी मुखर्जी हिनं केलाय.

मुंबई पोलिसांच्या चौकशीदरम्यान इंद्राणीनं हा दावा केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्राणीनं शीना जिवंत असून ती सध्या अमेरिकेत सुरक्षित असल्याचा दावा केलाय.

मग, इंद्राणी हत्येच्या आरोपाखाली तुरुंगात असतानाही शीना समोर का येत नाही? या प्रश्नावरही इंद्राणीकडे उत्तर तयार आहे. शीना आपला तिरस्कार करत असल्यानं ती समोर येत नसल्याचं तिचं म्हणणं आहे.

इंद्राणी आपल्या कृत्याची कबुली दिलेली नाही. तिच्या तोंडून सगळी कहानी वदवून घेणं पोलिसांनाही जड जातंय. यासाठी पोलीस या हत्याकांडाच्या वेळी अमेरिकेला जाणाऱ्या प्रवाशांची माहिती घेत आहेत.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, २४ एप्रिल २०१२ रोजी शीनाची हत्या करण्यात आली होती. इंद्राणीनं तिचा दुसरा पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर श्याम राय यांच्या मदतीनं शीनाची हत्या केल्याचं आत्तापर्यंतच्या तपासात पुढे आलंय. पण, हे कोर्टात सिद्ध करण्याचं आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *