दिल्लीतील सर्व खासगी कार्यालये बंद ; कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचा आदेश ; रेस्ताराँ-बारही बंद, घरपोच सेवांना मुभा ;

दिल्लीतील करोनाचा संसर्गदर २५ टक्क्यांवर पोहोचल्यामुळे राजधानीत निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा व अपवाद केलेल्या खासगी सेवा वगळता सर्व खासगी कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश मंगळवारी राज्य सरकारने दिले असून कर्मचाऱ्यांनी घरातून कार्यालयीन कामे करण्याची सूचना करण्यात आली आहे.

खासगी बँका, रिझव्‍‌र्ह बँकेशी संबंधित कार्यालये, बिगर बँक वित्तीय संस्था, सूक्ष्मवित्तीय पुरवठादार संस्था, वकिलांची कार्यालये, कुरिअर सेवा तसेच, अत्यावश्यक सेवांमध्ये औषधपुरवठासंदर्भातील कार्यालये-दुकाने, दूरध्वनी सेवा, मालवाहतूक व विमान सेवा यांची कार्यालये मात्र खुली राहतील. या सेवांच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयांमध्ये जाण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्य आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. शहरातील रेस्ताराँ व बार बंद राहतील. रेस्ताराँची घरपोच सेवा मात्र सुरू राहणार आहे. मॉल व बाजार सम-विषय तारखांनुसार खुली राहतील. रात्रीची संचारबंदी तसेच, शनिवार-रविवारची ४८ तासांची संचारबंदीही कायम राहणार आहे. राज्य सरकार व केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती असून उर्वरित कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची मुभा देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *