मुंबईत करोना विषाणूचा कहर सुरूच आहे. सीबीआयच्या मुंबई कार्यालयात शनिवारी करोनाचा स्फोट झाला. शनिवारी ६८ कार्यालयीन कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सीबीआयचे कार्यालय मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे. केंद्रीय तपास यंत्रणेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कार्यालयात काम करणाऱ्या २३५ लोकांना चाचणी करण्यास सांगितले होते. २३५ पैकी ६८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. करोनाबाधितांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, मुंबईत करोना बाधितांच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.
याआधी शुक्रवारी एकाच दिवसात मुंबई पोलिसांच्या किमान ९३ कर्मचाऱ्यांना कोविड-१९ ची लागण झाल्याचे आढळून आले होते. या प्रकरणांमुळे, मुंबई पोलीस विभागातील संक्रमितांची संख्या ९,६५७ वर पोहोचली आहे, ज्यामध्ये १२५ जवानांचा समावेश आहे. सध्या ४०९ बाधित पोलिसांवर उपचार सुरू आहेत. तसेच गेल्या ४८ तासांत करोनाग्रस्त दोन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. करोनाची बाधा झालेल्या ५७ वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाचा हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. तसेच मोटर परिवहन विभागात कार्यरत पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक महेंद्र भाटी यांचा शनिवारी सकाळी मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील करोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या १२५ वर पोहोचली आहे. पोलीस खात्यातील करोना बाधीत रुग्णांची संख्या अशीच वाढल्यास कोविड सेंटर पुन्हा सुरू करण्यात येतील, असे वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
दरम्यान, दरम्यान, लागोपाठ दुसऱ्या दिवशी राज्यात ४१ हजार नवे रुग्ण आढळले, तर १३३ जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला. केंद्रीय आरोग्य विभागाने शनिवारी दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत करोनाचे नवे १,४१,९८६ रुग्णांची नोंद झाली. यात ३,०७१ रुग्ण ओमायक्रॉनचे आहेत.
राज्यात २९ डिसेंबरपासून दैनंदिन रुग्णवाढ मोठय़ा प्रमाणावर झाली होती. दररोज पाच ते दहा हजारांपर्यंत वाढीव रुग्णांची भर पडली होती. या तुलनेत गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस रुग्णवाढ फार झालेली नाही. राज्यात ४१ हजार नवीन रुग्ण आढळले असले तरी गेल्या चार-पाच दिवसांतील नवीन रुग्णांची संख्या लक्षात घेता, गेल्या दोन दिवसांत रुग्णसंख्या काहीशी स्थिरावल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
