सोलापूरमधील पक्षांचं नंदनवन ठरलेल्या उजनी जलाशयात यावर्षी प्रथमच युरोपातून हिवाळी पाहुणा म्हणून बीनहंस पक्षी येऊन दाखल झाला आहे. अकलूज येथील पक्षी निरीक्षक ऋतुराज कुंभार व दिग्विजय देशमुख या वन्यजीव छायाचित्रकारांनी नुकतेच आपल्या कॅमेऱ्यात या बीनहंसाची छबी कैद केली आहे. हंस गणातील कलहंस हे यापूर्वी या ठिकाणी अनेक वेळा आल्याची नोंद आहे. मात्र बीन हंस पक्षी, उजनी निर्मितीनंतर पहिल्यांदाच आला आहे. तो सध्या भिगवणच्या जवळपास पसरलेल्या विस्तीर्ण पाणफुगवट्यावरील उथळ पाण्याच्या ठिकाणी पट्टकदंब हंसांच्या थव्यात विहार करताना दिसतो.
दरवर्षी हिवाळ्यात रशियाजवळच्या युरेशिया, सायबेरिया मंगोलिया येथून पट्टकदंब हंस, चक्रवाक बदक, पाणटिवळे, धोबी व अन्य स्थलांतरित पक्षी हिमालयाची हिमशिखरे ओलांडून भारतीय उपखंडात येऊन दाखल होतात. पुढे ३-४ महिने विविध राज्यांमधील जलस्थानांवर वास्तव्य करून पुन्हा आपल्या मूळ प्रदेशाकडे निघून जातात. या पक्षांच्या संगतीने युरोपातील ब्रिटन, नार्वे, कॅनडा येथील बर्फाच्छादित प्रदेशातील काही टुन्ड्रा व टायगा हंसपक्षी भरकटत भारतात येतात. त्यातलाच हा प्रकार म्हणजे यावेळी उजनीवर बीन हंस येऊन दाखल झालेला आहे.
