कोव्हिशिल्ड लशीला सरसकट परवानगीची ‘सीरम इन्स्टिटय़ूट’ची मागणी

 कोव्हिशिल्ड या करोना प्रतिबंधक लशीने आतापर्यंत १२५ कोटींच्या मात्रांचा पुरवठा केला आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड लशीला संपूर्ण बाजार मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी ‘सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’चे (एसआयआय) मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी केली. संपूर्ण बाजार मंजुरीसाठी पूनावाला यांनी भारताचो औषध नियामक मंडळ आणि आरोग्य मंत्रालयाकडे अर्ज केला आहे.

युरोपमधील अ‍ॅस्ट्राझेनका या कंपनीने निर्मिती केलेल्या लशीचे ‘सीरम इन्स्टिटय़ूट’ भारतीय उत्पादक असून भारतात या लशीचा कोव्हिशिल्ड या नावाने पुरवठा करण्यात आला. जानेवारीमध्ये देशाची लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लशींचा सर्वाधिक प्रमाणात देण्यात आल्या. ‘‘कोव्हिशिल्ड लशीच्या १२५ कोटी मात्रांचा आतापर्यंत पुरवठा करण्यात आला आहे. संपूर्ण बाजार मंजुरी देण्यासाठी कोव्हिशिल्ड लशीच्या पुरवठय़ाची पुरेशी आकडेवारी आहे. त्यामुळे संपूर्ण बाजार मंजुरीची परवानगी देण्यासाठी भारतीय औषध नियामक मंडळ आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे अर्ज केला आहे, असे पूनावाला यांनी शुक्रवारी ट्विट करून सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *