पियुष जैननंतर आता पुष्पराज उर्फ ‘पाम्पी’ जैन आयकर विभागाच्या रडारवर; ५० ठिकाणी छापेमारी!

उत्तर प्रदेशमध्ये सध्या अत्तर व्यापारी आणि शेकडो कोटींच्या घबाडाची जोरदार चर्चा सुरू आहे. पियुष जैन नावाच्या एका अत्तर व्यापाऱ्याच्या घरी आयकर विभागानं टाकलेला छापा तीन दिवस चालला. यामध्ये तब्बल २५७ कोटींचं घबाड त्यांच्या हाती लागलं. ही रोकड एवढी होती, की ती जप्त करून नेण्यासाठी विभागाला चक्क कंटेनर मागवावा लागला! पण त्यानंतर आता अजून एक अत्तर व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर आहे. विशेष म्हणजे त्याचं नाव देखील पी. जैन अर्थात पुष्पराज उर्फ पाम्पी जैन आहे. हा व्यापारी देखील कानपूरमध्येच राहातो. एवढंच काय, तर हे दोघे जैन एकाच परिसरात देखील राहतात!

मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने पुष्पराज उर्फ पाम्पी जैनच्या सुमारे ५० ठिकाणी छापमारी सुरू केली आहे. यामध्ये त्याच्या कानपूरमधील कार्यालये, कारखान्यांसोबतच कनौजमधील ठिकाणांचा देखील समावेश आहे. उत्तर प्रदेशच्या बाहेर देखील पाम्पी जैनच्या नावे काही मालमत्ता असून तिथे देखील छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पियुष जैनकडून तब्बल २५७ कोटींचं घबाड हाती लागल्यानंतर आता पाम्पी जैनकडून किती वसूली होणार? याची जोरदार चर्चा उत्तर प्रदेशमध्ये सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *