कणकवली तालुक्याची कृषीप्रधान म्हणून ओळख आहे. गेल्या काही वर्षामध्ये मध्यम प्रकल्प व लघु प्रकल्प पूर्णत्वास गेल्यामुळे ऊस शेती, भात शेती इतर पिके शेतकरी घेत आहेत. मात्र गतवर्षीच्या तुलनेत कणकवली तालुक्यातील ११ धरण प्रकल्पापैकी ५ धरण प्रकल्पामध्ये शंभर टक्के पाणीसाठा ऑगस्ट अखेर झाला आहे.
पावसाळा ऋतू संपत आला तरी अजून ६ धरणे पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झालेला नाही. त्यामुळे उन्हाळयामध्ये शेतक-यांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागाार आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये पाऊस समाधानकारक पडत होता. मात्र यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेने कमी पाऊस पडला आहे.
दरवर्षी आवश्यकतेनुसार धरणांमध्ये पाणी साठा होत असतो. तालुक्यातील कुर्ली घोणसरी धरण प्रकल्प व अन्य लघु प्रकल्पामध्ये पाणी साठा मुबलक असतो. त्यामुळे ऊस शेतीसह उन्हाळी इतर पिके स्थानिक शेतकरी घेत असतात. मात्र यावर्षी गतवर्षीच्या तुलनेपेक्षा कमी पाऊस पडला आहे. जिल्हयातील एकूण ३२ धरणांपैकी सुमारे १५ लघुपाटबंधारे प्रकल्प शंभर टक्के भरलेली आहेत. उर्वरित १७ धरणांपैकी निम्म्याहून अधिक धरणांमध्ये ५० टक्के पाणीसाठा झालेला आहे.
उन्हाळयामध्ये संभाव्य पाणी टंचाई भासू नये म्हणून पाटबंधारे खात्यामार्फत शेतीसाठी पाणी सोडण्याबाबत नियोजन करण्याची गरज आहे. तसेच गावागावामध्ये सिमेंट बंधारे व वनराई बंधारे बांधून पाणी साठा केला पाहिजे. यासाठी गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रा. प. सदस्य व प्रतिष्ठीत नागरिंकानी पाण्याचे महत्त्व गावागावात समजावून सांगण्याची गरज आहे.
जिल्हयामध्ये एकूण ३२ पाणीसाठा करण्यासाठी छोटे-मोठे प्रकल्प आहेत. यापैकी निम्मे प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा झाला आहे. तर उर्वरित प्रकल्पांमध्ये या वर्षी कमी प्रमाणात पडणा-या पावसामुळे ऑगस्ट अखेर धरणांमध्ये अजून पर्णपणे साठा झालेला नाही. पावसाळा ७५ टक्के संपत आला आहे. तर यापुढे पडणा-या पावसाळामुळे शिल्लक धरणांचा साठा १०० टक्के भरणार की नाही हे पावसावर अवलंबून आहे.
सध्या सुरू असलेल्या पावसाचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेने कमी आहे. पाऊस कमी पडत असल्यामुळे या वर्षी उन्हाळयामध्ये संभाव्य पाणी टंचाईला सिंधुदुर्ग जिल्हयातील जनतेला सामोरे जावे लागणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये २ मोठे प्रकल्प २ लहान प्रकल्प तर २८ लघुपाटबंधारे प्रकल्प आहेत. ३१ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्हयातील पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे पाणी साठा आहे. कणकवली तालुक्यातील देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पामध्ये एकूण पाणीसाठा ९८.०२० द.ल.घ.मी. सध्या ६३.६४ द.ल.घ.मी. इतका साठा असून आतापर्यंत ६४.९३ टक्के पाणीसाठा झालेला आहे.

