बिहारमध्ये कारखान्यातील स्फोटात ६ ठार

 बिहारच्या मुझफ्फरपूरमधील एका कारखान्यातील बॉयलरमध्ये रविवारी स्फोट होऊन ही इमारत खाली कोसळल्याने किमान ६ जण ठार, तर अनेक जण जखमी झाले. स्फोटामुळे या परिसरातील अनेक इमारतींचेही नुकसान झाले.

मुझफ्फरपूरचे जिल्हा दंडाधिकारी प्रणय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेला औद्योगिक वसाहतीतील नूडल्स व इतर खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या एका कारखान्यात सकाळी साडेनऊच्या सुमारास हा स्फोट झाला.

या प्रचंड स्फोटाचा आवाज दूरवर ऐकू गेला. स्फोटामुळे या परिसरातील इतर अनेक इमारतींचे छतही उडून गेले आणि या कारखान्याच्या इमारतीचा तर केवळ ढिगारा शिल्लक राहिला. स्थानिक प्रशासन, पोलीस व अग्निशामक दल बचावकार्य करण्यासाठी घटनास्थळी रवाना झाले. सहा मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात येऊन शवचिकित्सेसाठी पाठवण्यात आले.

गंभीर जखमी झालेल्या सहा जणांना एसकेएमसीएच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत जाहिर केली असून, स्फोटाचे कारण शोधण्यासाठी व  जबाबदारी निश्चित करण्यासाठी एक पथक स्थापन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *