मुंबईमध्ये येत्या २६ जानेवारीपर्यंत १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिका प्रशासनाने ठेवले आहे. अद्याप १४ लाख नागरिकांची दुसरी मात्रा २६ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट पालिकेने ठेवले आहे.
जनगणनेच्या सांख्यिकी आधारे आणि पात्र नागरिकांची संख्या लक्षात घेता, शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आपापल्या क्षेत्रात लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करून दिले आहे. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सुमारे ९२ लाख ३६ हजार ५०० पात्र नागरिकांचे कोविड लसीकरण (दोन्ही मात्रा मिळून) करावयाचे आहे. मुंबई महानगरपालिकेने ९२ लाख नागरिकांना पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट नोव्हेंबर महिन्यातच पूर्ण केले होते. मात्र दुसऱ्या मात्रेबाबत अद्याप हे लक्ष्य पूर्ण झालेले नाही. जगभरात करोना विषाणूचा नवीन प्रकार असलेल्या ओमायक्रॉनच्या संसर्गाचा धोका असल्यामुळे पालिकेने लसीकरणावर भर दिला आहे.
दरम्यान, मुंबईत होणाऱ्या लसीकरणात मुंबईबाहेरील नागरिकांचादेखील समावेश आहे. त्यामुळे पहिल्या मात्रेचे ९२ लाखांचे लक्ष्य पूर्ण केल्यानंतरही अद्यापही पहिली मात्रा घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे पालिका क्षेत्रात पहिल्या मात्रेचे १०० टक्क्यांहून अधिक लसीकरण झाले आहे. मुंबईत आतापर्यंत ९९ लाखांहून अधिक नागरिकांनी पहिली मात्रा घेतली आहे. मात्र दुसऱ्या मात्रेसाठी अद्याप हे लक्ष्य गाठता आलेले नाही.
शनिवापर्यंत पहिली मात्रा घेणाऱ्यांची मुंबईतील संख्या ९९ लाख ६०२ इतकी झाली आहे. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसांत पहिली मात्रा घेणाऱ्यांची संख्या एक कोटी होण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरामध्ये पहिली आणि दुसरी मात्रा मिळून एकूण दीड कोटी मात्रा देण्याचा टप्पा १० नोव्हेंबर २०२१ रोजी पूर्ण झाला. त्यापाठोपाठ आता एक कोटी पहिल्या मात्रेचे लक्ष्य गाठून मुंबई महानगरपालिका प्रशासन लसीकरण मोहिमेत आणखी एक मैलाचा टप्पा गाठणार आहे.
दुसऱ्या मात्रेकडे पाठ फिरवणाऱ्या लोकांचाही शोध सुरू असून कालावधी उलटून गेलेल्या लोकांशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न सुरू असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
सद्य:स्थिती..
मुंबईत सध्या दररोज साधारण ४५ हजार नागरिकांचे लसीकरण होते आहे. आतापर्यंत १ कोटी ७७ लाख २० हजार ५८५ नागरिकांनी लस घेतली आहे. त्यापैकी ७८ लाख लोकांनी दोन्ही मात्रा घेतल्या आहेत.
