अनिल देशमुखांची न्यायालयीन कोठडी आज संपणार, पण अडचणी कायम; ईडी दुसरे आरोपपत्र दाखल करण्याच्या तयारीत

१०० कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी ईडीने अटक केल्यानंतर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांची कोठडी आज सोमवार २७ डिसेंबर रोजी संपणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीला अनिल देशमुखांच्या कोठडीत वाढ करण्यात आली होती. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी राज्य नियुक्त चौकशी आयोगाला माजी गृहमंत्र्यांनी कोणतीही आर्थिक मागणी केलेली नाही किंवा मुंबईतील बारमालकांकडून किंवा त्यांच्याशी संबंधित लोकांकडून पैसे घेतलेले नाहीत, असे सांगितल्यानंतर काही तासांतच देशमुखांच्या कोठडीत वाढ करण्यात आली होती.

१०० कोटी रुपयांच्या खंडणीचा आरोप आणि संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात १३ तास चौकशी केल्यानंतर २ नोव्हेंबर रोजी ईडीने देशमुख यांना अटक केली होती. हे सर्व आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केले होते. अनिल देशमुख गृहमंत्री असताना त्यांनी तत्कालीन सहाय्यक निरीक्षक सचिन वाझे यांना शहरातील हॉटेल्स आणि बारमधून दरमहा १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. सध्या देशमुख मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *