स्वयंपाक नीट बनवला नाही म्हणून पतीने चक्क पत्नीच्या पाठीचा घेतला चावा

पती-पत्नीचे किरकोळ कारणावरून भांडण झाल्याचं तर आपण अनेकदा पाहत किंवा बातम्यांमधून वाचत असतो. अनेकदा यामधून घरगुती हिंसाचाराचे प्रकारही घडतात. पिंपरी चिंचवड शहरात अशीच एक घटना घडली आहे. स्वयंपाक नीट बनवला नाही म्हणून पतीने चक्क पत्नीच्या पाठीचा कडकडून चावा घेतला. चावा इतका जोरात घेतला की यामध्ये पत्नीला जखम झाली आहे. अखेर सहनशीलता संपल्याने पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरोधात तक्रार दिली.

याप्रकरणी ५६ वर्षीय पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला बोलावून समज देऊन दोघांची भांडण मिटवली अशी माहिती भोसरी पोलिसांनी दिली आहे. दोघे पती आणि पत्नी उच्चशिक्षित आहेत असं पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५६ वर्षीय आरोपीने पत्नीला स्वयंपाक नीट झाला नाही म्हणून शिवीगाळ करत मारहाण केली. तसंच मुलीलादेखील मारहाण केली असं तक्रारीत सांगण्यात आलं आहे. यावेळी त्याने मद्यपान केलं होतं. मारहाण करत असताना आरोपी पतीने रागाच्या भरात पाठीचा कडाडून चावा घेतला असंही तक्रारीत सांगण्यात आलं आहे.

ही घटना भोसरीमध्ये घडली असून पती आणि पत्नी उच्चशिक्षित आहेत. पती मद्यपान करून नेहमी पत्नीला मारहाण करत असे. मात्र पाठीचा कडाडून चावा घेतल्याने पत्नीची सहनशीलता संपली अन् पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पतीला समज दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *