राय वादळाच्या तडाख्यातून सावरत असलेल्या फिलिपाइन्समध्ये आता उपासमारीचे संकट उद्भवण्याची भीती असून आपल्याकडील अन्नसाठा आता संपुष्टात येत असल्याची कैफियत वादळग्रस्तांनी मांडली आहे.
दिनाघाट बेटावरील तुबाजोनच्या महापौर फेली पेद्राब्लान्का यांनी सांगितले की, कदाचित काही दिवसांत आमच्याकडील अन्नपदार्थांचा साठा पूर्णत: संपलेला असेल.
वादळग्रस्त भागातील नागरिक आणि अधिकाऱ्यांनी मंगळवारी अन्नपदार्थ, पेयजलचा पुरवठा आणि निवाऱ्याची व्यवस्था होण्याची आवश्यकता व्यक्त केली. तेथील रस्त्यांची दुरवस्था, पूरस्थिती आणि विस्कळीत झालेला वीजपुरवठा आणि संपर्क यंत्रणा यामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत.
फिलिपाइन्सला गेल्या गुरुवारी राय या वादळाचा तडाखा बसला. यात सुमारे चारशे लोकांचा मृत्यू ओढवला आहे. वादळामुळे १८ लाख नागरिकांना फटका बसला असून त्यापैकी सहा लाख ३० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या मानवी समस्याविषयक विभागाच्या समन्वयक कार्यालयाने दिली. या बेटांच्या पट्ट्यात यंदा या वादळाने सर्वाधिक हानी घडविली आहे.
