दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, बोर्ड परीक्षेसाठी अधिक वेळ मिळणार

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी अर्धा तास अधिक वेळ मिळणार आहे. मागील दोन वर्षांत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षण घेतले आहे. यामुळे लिखाणाचा सराव सुटल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. आता ही परीक्षा साडेतीन तासांची असेल.

दहावी व बारावी परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहे. यामध्ये ७० आणि त्याहून अधिक गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी ३० मिनिटे आणि ७०हून कमी गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी १५ मिनिटे अधिक वेळ मिळणार आहे, असे शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केले. ऑनलाइन शिक्षणामुळे गतवर्षीही हा बदल करण्यात आला होता. मात्र त्यावेळी ऑफलाइन परीक्षाच झाली नाही.

७०, ८० आणि १०० गुणांच्या पेपरसाठी अर्धा तास, तर ४०, ५० आणि ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे वेळ वाढवून देण्यात आली आहे. यंदा दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी २९ लाख ५४ हजार ७४१हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यामध्ये दहावीचे १५ जाख २७ हजार ७६१ तर बारावीचे १४ लाख २६ हजार ९८० विद्यार्थी आहेत. यंदा बारावीची परीक्षा ४ ते ३० मार्च तर दहावीची परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत पार पडणार आहे. विद्यार्थ्यांना सविस्तर वेळापत्रक https://www.mahasscboard.in या वेबसाइटवर पाहता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *