विमानतळांवर ‘आरटीपीसीआर’ चाचणीसाठी आगाऊ नोंदणी बंधनकारक; जोखमीच्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांबाबत धोरण

करोना प्रसाराची जोखीम असलेल्या देशांतून भारतात येणाऱ्या विमान प्रवाशांनी येथे त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यासाठी आगाऊ नोंदणी करणे अनिवार्य करण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी २० डिसेंबरपासून होणार आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, बेंगळूरु आणि हैदराबाद विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांसाठी हा नियम लागू केला जाईल.

करोनाच्या ओमायक्रॉन या उत्परिवर्तित विषाणूच्या प्रसाराचा वाढता धोका लक्षात घेता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. जोखमीच्या देशांतील विमान प्रवाशांना भारतातील विमानतळावर उतरल्यानंतर आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या चाचणीसाठी त्यांना आगाऊ नोंदणी करून ठेवावी लागेल. असे असले तरी चाचणीसाठी आगाऊ नोंद न केलेल्या प्रवाशांनाही विमानात प्रवेश दिला जाईल, पण अशा प्रवाशांसाठी आगाऊ नोंद करण्याची जबाबदारी संबंधित विमान कंपनीवर असेल.

इंग्लंडमध्येही सध्या विमान प्रवाशांसाठी अशीच मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तेथे जाणाऱ्या प्रवाशांनाही आरटीपीसीआर चाचणीसाठी आगाऊ नोंदणी करणे बंधनकारक आहे. अशी नोंदणी न केल्यास त्या प्रवाशाला ब्रिटनकडे जाणाऱ्या विमानात प्रवेशसुद्धा दिला जात नाही.

यासंबंधी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या प्रवाशांनी जोखमीच्या देशांना १४ दिवसांपूर्वी भेट दिली आहे किंवा जे अशा देशांतून येत आहेत, त्यांना आरटीपीसीआर चाचणीसाठी आगाऊ नोंदणी करणे शक्य व्हावे, यासाठी एअर सुविधा पोर्टवर बदल केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात देशातील सहा महानगरांत अशी चाचणी सुविधा उपलब्ध केली जाईल.

हे देश जोखमीचे…

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, करोना प्रसाराबाबत जोखमीचे समजल्या जाणाऱ्या देशांत ब्रिटनसह अन्य युरोपीय देश, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बोटस्वाना, चीन, घाना, मॉरिशस, न्यूझीलंड, झिम्बाब्वे, टांझानिया, हाँगकाँग आणि इस्रायल यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *