पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढतच असून रोजच्या रोज धक्कादायक घटना समोर येत आहेत. तळजाई परिसरात अशीच एक घटना समोर आली आहे. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या २२ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी तळजाई पोलिसांनी गुन्हा दाखल करून, या मुलीच्या मित्राला अटक केली आहे. या घटनेमुळं परिसरात खळबळ उडाली आहे.
पुण्यातील तळजाई टेकडीवर बर्थडे पार्टीसाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणीवर टेकडीवरील जंगलात बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शुभम सीताराम शिंदे (वय १९ वर्ष, रा. धनकवडी) याला अटक करण्यात आली आहे. सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक एस. देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास पीडित तरुणीला आरोपी शुभम याने वाढदिवसाच्या पार्टीला बोलावले. ‘तू पार्टीला आलंच पाहिजे. तळजाई शेवटचा बस स्टॉप येथे ये’ असं त्यानं पीडित मुलीला सांगितलं. त्यानंतर जेव्हा पीडित तरुणी त्या ठिकाणी पोहोचली, त्यावेळी आरोपी शुभम याच्यासोबत त्याचा एक मित्र देखील तिथं होता. आरोपी आणि त्याचा मित्र हे दारू पीत बसले होते. पीडित तरुणी बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत जाऊन बसली. या भागात थंडी अधिक असल्याने तरुणी तिथेच झोपी गेली. त्यानंतर आरोपी शुभम तिला जवळच असलेल्या जंगलात घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
पीडित तरुणीने तात्काळ सहकार नगर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी तक्रार दिली. याच तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी शुभम शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला व त्याला अटक केली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
