शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची ईडीकडून 12 तास कसून चौकशी करण्यात आली आहे. त्याआधी रामनगर साखर कारखाना खरेदीप्रकरणी जालना येथे ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली.
राज्यातील सत्ताधारी पक्षातील लोकांच्या आणि नेत्यांच्या घरी आणि साखर कारखान्यांवर ईडीकडून छापेमारी करण्यात येत आहे. याआधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकांवर केंद्रीय संस्थांकडून छापेमारी करण्यात आली होती. तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची तसेच त्यांच्या पत्नीची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. सध्या ते ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांच्या मुलाचीही ईडीकडून चौकशी होणार आहे. राज्यात औरंगाबाद, लातूर, पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत ईडीकडून छापेमारी सुरुच आहे.
शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची सलग 12 तास चौकशी सुरु होती. रात्री 2 वाजेपर्यंत ही चौकशी सुरु होती. 2 वाजेनंतर ईडीचं पथक औरंगाबादकडे रवाना झाले आहे. रामनगर साखर कारखाना खरेदी प्रकरणी अर्जुन खोतकर यांच्या घरावर ईडीने काल छापेमारी केलीय. दरम्यान, याआधी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे.
