दारुविक्रीतून घरात घुसून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. सातार्यातील सदरबझारमध्ये रात्रीच्या या तुफान राड्याची जोरदार चर्चाआहे. दारुविक्रीतून घरात घुसून मारहाण झाल्याने परिसरात नागरिक संतप्त झाले. यातून एका गटाने तुफान हल्ला चढवत वाहनांची तोडफोड आणि हाणामारी केली.
या तोडफोडीच्या घटनेने सदरबझारमध्ये काही वेळासाठी रात्री तणाव निर्माण झाला होता. या घडलेल्या घटनेच्या विरोधात आणि संशयितांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी सुमारे 50 हून अधिक जणांच्या जमावाने शहर पोलीस ठाण्याला घेराव घातला होता.
रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास बेकायदेशीर दारु विक्री करणार्या एका टोळक्याने धुडगूस घातला. घरात घुसून या टोळक्याने तरुणाला दमदाटी केली. ते एवढ्यावर न थांबता त्यांनी त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या राड्यामुळे परिसरात नागरिक दहशतीखाली होते. यातूनच टोळक्याने परिसरातील काही वाहनांची तोडफोड देखील केली. हा सर्व प्रकार सुमारे अर्धा तास सुरु होता.
या राड्यानंतर सदरबझारमध्ये नागरिक हळूहळू एकत्र जमू लागले. दहशतीचे वातावरण केल्याने नागरिकांनी या संतप्त घटनेविरुध्द कठोर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणे गाठले. शेकडोंचा जमाव शहर पोलीस ठाण्यासमोर आल्यानंतर पोलिसांना धक्का बसला. अचानक जमाव आल्याने पोलिसांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले. पोलिसांनी तक्रार घेवून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.
