भाईंदर पूर्वेला रस्त्यालगत अवैध फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पालिका अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ करण्यात आल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. दोन महिन्यांपूर्वीही भाईंदर पश्चिमेला फेरीवाल्यांनी अधिकाऱ्यांना मारहाण केली होती. भाईंदर पूर्वेकडील बीपी रोडवरील अवैध फेरीवाल्यांवर कारवाईसाठी पालिकेच्या प्रभाग ३चे अतिक्रमणविरोधी पथक प्रमुख प्रशांत पाटील कर्मचारी व सुरक्षारक्षकांसह मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गेले. पालिका कर्मचाऱ्यांनी फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करण्यास सुरुवात करताच फेरीवाल्यांनी एकत्र येत विरोध केला. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना घेराव घालून धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. याप्रकरणी नवघर पोलिस ठाण्यात कमलेश गुप्ता, संजय गुप्ता, सचिन गुप्ता व संजीव गुप्ता यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
