मिरा रोडमध्ये २२ लाखांचे अमली पदार्थ जप्त

मिरा-भाईंदर मार्गावर अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या एकासह त्याला हे पदार्थ पुरवणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एकूण २२ लाखांचा एमडी अमली पदार्थविरोधी पथकाने जप्त केला आहे.

मिरा रोडच्या मॅकडॉनाल्ड्स परिसरात बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अमली पदार्थविरोधी कक्षाचे अधिकारी गस्त घालत असताना त्यांना फरहाद बिश्वास नामक व्यक्ती संशयास्पद दिसली. त्याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडे पाच ग्रॅम एमडी आढळून आला. अरबाज खान व अकील अन्सारी विक्रीसाठी अंमली पदार्थ पुरवत असल्याची माहिती चौकशीत त्याने दिली होती. त्यानुसार अरबाज व अकील यांच्या नया नगर येथील घरात छापा टाकला असता २७१ ग्रॅम एमडी आढळून आला. याची बाजारात २२ लाख रुपये किंमत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी तिघांविरोधात मिरा रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *