मुंबई आणि उपनगरात लोकलने प्रवास करताना अनेकदा लोकलच्या तांत्रिक बिघाडाचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यात बिघाडाची योग्य माहिती उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण पसरते.
मात्र आता मध्य रेल्वेवर एखाद्या तांत्रिक बिघाडामुळे खोळंबा झाल्यास त्याची नेमकी माहिती प्रवाशांना मिळावी, या हेतूने रेल्वे स्थानकांप्रमाणेच थेट लोकलच्या डब्यात उदघोषणा सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
मध्य रेल्वेवरील ७५ लोकल्सच्या डब्यांमध्ये याआधीच स्पिकर्स बसवण्यात आले आहेत. यातून आत्तापर्यंत पुढील स्थानकाची माहिती प्रवाशांना दिली जात होती. मात्र एखादा बिघाड झाल्यास कोणतीही सूचना प्रवाशांना दिली जात नसल्याने प्रवाशांचा गोंधळ उडत होता.
यातून रेल्वेला नेहमीच प्रवाशांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. त्यानंतर उशिराने जाग आलेल्या मध्य रेल्वेने अखेर लोकलच्या डब्यातील स्पिकर्समध्ये प्रवाशांना बिघाडाची माहिती देण्याचा निर्णय घेतला असून पश्चिम रेल्वेवर याआधीच बिघाडाची घोषणा सुरू करण्यात आली आहे.
येत्या आठवडय़ापासून मध्य रेल्वेच्या ताफ्यातील सर्व सिमेन्स लोकल्समध्ये ही उद्घोषणा सुरू करण्यात येणार असून ही उद्घोषणा लोकलमधील गार्डकडून करण्यात येणार आहे. सध्या मध्य रेल्वेच्या ताफ्यात सिमेन्सच्या ६० लोकल असून त्यांच्या दिवसाला ६५० फे-या होतात.

