सहा षटकं, सहा निर्धाव, शून्य धावा आणि चार विकेट्स. ही कामगिरी आहे भारताचा उदयोन्मुख डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलची. तीही एका परदेशी संघाविरुद्धच्या प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात.
अक्षर पटेलच्या याच कामगिरीनं भारत अ संघाला दुसऱ्या अनधिकृत कसोटीत दक्षिण आफ्रिका अ संघावर एक डाव आणि 81 धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. हा चारदिवसीय सामना केरळच्या वायनाडमध्ये खेळवण्यात आला.
या सामन्यात डावाचा मारा चुकवण्यासाठी दक्षिण आफ्रिका अ संघासमोर 157 धावांचं माफक आव्हान होतं. पण अक्षर पटेलच्या प्रभावी फिरकीसमोर दक्षिण आफ्रिकी फलंदाजांनी अवघ्या 76 धावांत लोटांगण घातलं. पटेलनं सहा षटकांमध्ये एकही धाव न देता दक्षिण आफ्रिकेच्या चार फलंदाजांना माघारी धाडलं. या सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये मिळून अक्षर पटेलनं 92 धावांत नऊ विकेट्स घेतल्या. त्यानं पहिल्या डावात नाबाद 69 धावांची खेळी करून या सामन्यावर आपल्या अष्टपैलूत्वाची छाप पाडली.

