अतिवृष्टीने पिके पाण्यात गेली असून, खरीप हंगाम हातचा गेला

मराठवाडय़ात अतिवृष्टीने पिके पाण्यात गेली असून, खरीप हंगाम हातचा गेला आहे. सोयाबीन सडून गेले असून, ऊस मुळासह गळून पडला. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मराठवाडय़ातील ४४६ महसूल मंडळांपैकी ३६१ मंडळांत अतिवृष्टी नोंदविण्यात आली. त्यातील २४८ महसूल मंडळांत दोनदा तर ९६ महसूल मंडळांत तीन वेळा अतिवृष्टी नोंदविण्यात आली. बीड आणि लातूर जिल्ह्यातील पाटोदा महसूल मंडळात ११ वेळा अतिवृष्टी झाली. या गावातील शेतकरी भीमराव पवार म्हणाले, आता सारे पाण्यातच आहे. काही शेतात नुसताच गाळ दिसतो आहे. सारे पीक हातचे गेले आहे. ही फक्त एका शेतकऱ्याची अवस्था नाही तर मांजरा नदीच्या भोवताली पाच किलोमीटरच्या पट्टय़ात सारे चित्र असेच आहे. जनावरे वाहून गेली आहेत. या महसूल मंडळात काम करणाऱ्या महसूल अधिकारी देशमुख म्हणाल्या, ‘आधीचा पंचनामा करेपर्यंत पुढे आणखी पाऊस येतो. पूर स्थितीमुळे पंचनामे करणेही अवघड होऊन बसले आहे. पण आधी माणूस वाचविणे हे काम केले. आता पंचनामे करीत आहोत.’’ याच मंडळातील देवळा गावातील सरपंच नामनाथ सोपान म्हणाले, ‘‘सोयाबीन काढताना राम बाबासाहेब कदम हा ३१ वर्षांचा तरुण वाहून गेला. त्याच्या वडिलांचे आधीच निधन झाले होते.’’ नदी किनारच्या पाटोदा मंडळातील १९ गावांची अवस्था वाईट आहे. पिके सडून गेली आहेत. शिवारात पाणीच पाणी आहे. मराठवाडय़ात सर्वाधिक पाऊस जालना जिल्ह्यात सरासरीपेक्षा १७८ तर लातूरमध्ये सर्वात कमी म्हणजे सरासरीच्या १२८ टक्के पाऊस झाला आहे.

मराठवाडय़ात सोयाबीन आणि ऊस शेतीला मोठा फटका बसला. मराठवाडय़ात यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत ३५ लाख ६४ हजार ६९१ शेतकऱ्यांची २५ लाख ९८ हजार हेक्टर शेती बाधित झाली असावी, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

उत्तर महाराष्ट्रातही पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. नाशिकच्या ग्रामीण भागांत कपाशी, कांदा, मका, बाजरी, मूग, उडीद, सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. जळगाव- शहरासह जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जामनेर या तालुक्यांत मुसळधार पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *