मुंबईतील आरे कॉलनीत २५ वर्षीय तरुणाने बिबट्याच्या मागे जंगलात धाव घेत आपल्या भाच्याची अक्षरश: मृत्यूच्या पंजातून त्याची सुटका करत जीव वाचवला आहे. २६ सप्टेंबरला संध्याकाळी आयुष घराच्या अंगणात खेळत असताना बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. सुदैवाने यावेळी आयुषचा मामा विनोद कुमार तिथेच होता. त्याने तात्काळ बिबट्याच्या मागे धाव घेत आयुषला वाचवलं.
“मी दरवाजात उभा असताना बिबट्याने आयुषवर हल्ला केल्याचं पाहिलं. आयुषची मान पकडून बिबट्या जंगलाच्या दिशेने धावत होता. हे पाहिल्यानंतर यानंतर मी आरडाओरडा करत बिबट्याच्या मागे धाव घेतली. यानंतर बिबट्याने आयुषचं डोकं पकडलं होतं. पण नंतर त्याची पकड सैल झाली आणि आयुष खाली पडला. मी लगेच त्याच्या दिशेने धाव घेतली आणि आपल्याजवळ ओढून घेतलं,” असं विनोद कुमारने सांगितलं आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात आयुष जखमी झाला असून त्याच्या गळा आणि डोक्यावर टाके पडले आहेत. हल्ल्यानंतर स्थानिक सुर्योदयानंतर घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. आयुषची आई आरती यादव यांनीही आपण घाबरलो असून आपला मुलगा सुखरुप असल्याबद्दल देवाचे आभार मानले आहेत. मुंबईतील आरे कॉलनीत एका वयस्कर महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. अंगावर काटा आणणारा हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी मुलावर हल्ला झाला त्याठिकाणी पिंजरा लावला आहे. दरम्यान विनोद कुमारने स्थानिक प्रचंड भीतीमध्ये असून याआधी ते रात्रीपर्यंत जागे असायचे पण आता सुर्योदय झाला की घरात जातात असं म्हटलं आहे. प्राथमिक विधीला जातानाही कोणी एकटं न जाता, सोबत चार लोक जातात अशी माहिती त्यांनी दिली आहे.
