काबूल विमानतळाजवळ गुरुवारी झालेल्या बॉम्बस्फोटात १८०हून अधिक लोक ठार झाले. मृतांमध्ये १००हून अधिक अफगाण नागरिक, १३ अमेरिकी सैनिक आणि तीन ब्रिटिश नागरिकांचासमावेश असल्याचे वृत्त आहे. दोन नव्हे तर एकाच आत्मघाती हल्लेखोराने हा स्फोट घडवल्याचे अमेरिकेचे मेजर जनरल विल्यम टेलर यांनी सांगितले. दरम्यान, अमेरिकेने आणखी आत्मघाती हल्ल्यांची भीती वर्तवली आहे.
विमानतळापासून ५०० मीटर अंतरावर शस्त्रांचा मोठा साठा असल्याचे दिसून आले असून विमानतळावर जाण्याचे धाडस कुणी करताना दिसत नाही. अनेकांनी मृतदेह नेले असून त्यांची मोजदाद झालेली नाही. त्यामुळे मृतांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. अनेक देशांनी आपल्या नागरिकांना येथून सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या मोहिमा बंद केल्या आहेत. ब्रिटनने काही तासातच मोहिमा थांबवत असल्याचे जाहीर केले. जे अफगाणी लोक अमेरिकेबरोबर होते ते आता तालिबानच्या भीतीने घाबरून लपून बसले आहेत. आपण आता पूर्वीपेक्षा फार मवाळ झालो आहोत असा दावा तालिबानने केला असला तरी त्यावर कुणी विश्वास ठेवायला तयार नाही. आयसिसच्या सुन्नी दहशतवाद्यांशी मुकाबला करण्यात तालिबान कितपत यशस्वी ठरेल याबाबत साशंकता आहे. आयसिसचे संबंध सीरिया व इराकशी असून त्यांनी शियांवर अनेक हल्ले घडवून आणले आहेत.
आयसिसची कबुली
अफगाणिस्तानात काबूल विमानतळाबाहेर करण्यात आलेल्या हल्ल्याची जबाबदारी अफगाणिस्तानशी संबंधित आयसिस या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. खोरासान प्रांतातील आयसिसने म्हटले आहे,की आम्ही अमेरिकी सैन्य व अफगाणी मित्र गटांवर हल्ले केले आहेत. या दहशतवादी संघटनेने एक छायाचित्र जारी केले असून त्यात हल्ला करणाऱ्या बॉम्बरचा समावेश आहे. सदर व्यक्ती स्फोटकांसह आयसिसच्या काळ्या झेंड्यासमवेत उभा असलेला दिसत आहे. त्याचा चेहरा काळ्या कपड्यांनी झाकलेला आहे. त्याचे केवळ डोळे दिसत आहेत. आयसिसने दुसऱ्या आत्मघाती हल्लेखोराचा उल्लेख केलेला नाही. त्यांच्या दाव्याची स्वतंत्रपणे शहानिशा करता आली नाही. आयसिसने म्हटले आहे, की आमच्या बॉम्बरने अमेरिकी सैनिक, दुभाषे व इतर व्यक्ती असलेल्या ठिकाणी पोहोचून स्फोट केला. तालिबानचेही यात नुकसान झाले आहे.

