करोना टाळेबंदी आणि सततच्या र्निबधांमुळे नागरिक आर्थिक संकटात सापडले असून या पार्श्वभूमीवर सार्वजनिक उत्सव साजरे करण्यासाठी नागरिकांकडून सक्तीने वर्गणी गोळा करू नका, असे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. यामुळे गणेश मंडळांपुढे मोठा आर्थिक पेच निर्माण झाल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी गणेश मंडळांच्या मंडपाचे भाडे माफ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
गेल्या वर्षी करोना संकटामुळे राज्य शासनाने गणेशोत्सवावर निर्बंध घालत त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन मंडळांना केले होते. त्यास मंडळांनीही प्रतिसाद दिला होता. यंदाही राज्य शासनाने गणेशोत्सवासाठी निर्बंध लागू केले आहेत. परंतु गेल्या वर्षीपेक्षा यंदा करोना रुग्णांची संख्या कमी असतानाही निर्बंध लागू केल्याने मंडळांकडून नाराजीचा सूर उमटत होता. मंडळांच्या आग्रहानंतरही शासनाने निर्बंध शिथिल केलेले नाहीत. यामुळे मंडळांना यंदा र्निबधांच्या चौकटीतच राहून उत्सव साजरा करावा लागणार असून तशी तयारी मंडळांनी सुरू केली आहे. सार्वजनिक उत्सव मंडळे वर्गणी काढून उत्सव साजरा करतात. परंतु कोणत्याही नागरिकाकडून वर्गणी घेऊ नये, असे शासनाने निर्देश दिले आहेत. तसेच मंडपाजवळ जाहिरात बॅनर लावण्यास बंदी घातली आहे. यामुळे मंडळांपुढे मोठा आर्थिक पेच निर्माण झाला आहे. यातूनच मंडपाचे भाडे माफ करण्याची मागणी मंडळांनी काही दिवसांपूर्वी केली होती. या मागणीच्या आधारे महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेपुढे हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. परंतु वेळेअभावी ही सभा खंडित करण्यात आली. यामुळे हा प्रस्ताव चर्चेला आला नाही. त्यातच गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे हा प्रस्ताव सर्व नगरसेवक मंजूर करतील, या विश्वास व्यक्त करत महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी गणेश मंडळांचे मंडप भाडे माफ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
करोनाची परिस्थिती आटोक्यात असली तरी करोना अद्याप पूर्णपणे संपलेला नाही, याची जाणीव ठेवून सर्व गणेश मंडळांनी शासन आणि महापालिकेने केलेल्या नियम आणि सूचनांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

