पबजी (PUBG) या ऑनलाईन खेळाच्या व्यसनामुळे घडलेले अनेक धक्कादायक प्रकार आपण पाहिलेच आहेत. आता मुंबईतून देखील अशीच एक बातमी समोर येत आहे. एका १६ वर्षीय मुलाने फक्त पबजी खेळण्यासाठी एक धक्कादायक पाऊल उचललं आहे. या मुलाने पबजीसाठी ऑनलाइन व्यवहाराद्वारे आपल्या आईच्या अकाऊंटमधून चक्क १० लाख रुपये खर्च केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे आई-वडिलांनी फटकारल्यानंतर हा मुलगा जोगेश्वरी परिसरातील आपल्या घरातून पळून गेल्याची माहिती समोर येत आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने शुक्रवारी (२७ ऑगस्ट) याबाबत माहिती देताना सांगितलं की, मुलाच्या वडिलांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर, पोलिसांनी गुरुवारी (२६ ऑगस्ट) दुपारी अंधेरी (पूर्व) येथील महाकाली लेणी परिसरात पळून गेलेल्या मुलाचा शोध घेऊन त्याला त्याच्या पालकांकडे पाठवलं आहे.
बुधवारी (२५ ऑगस्ट) संध्याकाळी मुलाच्या वडिलांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दाखल केल्याचं असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. त्यानंतर, पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. मुलाच्या वडिलांनी तपासादरम्यान पोलिसांना सांगितलं की, “माझ्या मुलाला गेल्या काही महिन्यांपासून पबजीचं अक्षरशः व्यसन लागलं होतं. यावेळी त्याने मोबाईलवर खेळताना आईच्या बँक खात्यातून १० लाख रुपये खर्च केले.” तर पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, जेव्हा या मुलाच्या आई-वडिलांना या ऑनलाईन व्यवहाराची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी त्याला चांगलंच खडसावलं. त्यानंतर तो पत्र लिहून घर सोडून निघून गेला.”

