देशात सर्वाधिक वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा उच्चांक नोंदविणारे शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यामुळे शोकाकुल देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी राज्यभरातील नेते सांगोल्यात येत आहेत. देशमुख यांचे उचित स्मारक व्हावे, अशी मागणी आता जोर धरू लागली असून, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
गणपतराव देशमुख यांनी महाराष्ट्र विधिमंडळात तब्बल ५२ वर्षे दिलेले योगदान लक्षात घेता त्यांचे उचित स्मारक म्हणून विधान भवनाच्या आवारात त्यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी सूचना फडणवीस यांनी केली आहे. या संदर्भात सरकारकडे आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विचारांनी भले आमच्यात मतभिन्नता होती, परंतु देशमुख यांनी महाराष्ट्र राज्याची केलेली सेवा त्यांचा आयुष्यभराचा ध्येयवाद दर्शविते. म्हणून तरुण लोकप्रतिनिधींसमोर ध्येयवादी आदर्श राहण्यासाठी गणपतराव देशमुख यांचे पुतळारूपी स्मारक विधान भवनाच्या परिसरात उभारण्याची फडणवीस यांची सूचना आहे.
गणपतराव देशमुख हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील आदर्श व ध्येयवादी राजकारणी मानले जातात. एकाच मतदारसंघातून सर्वाधिक वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा द्रविड मुन्न्ोत्र कळघम पक्षाचे दिवंगत नेते एम. करुणानिधी यांचा विक्रम मोडणारे गणपतराव देशमुख हे सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला या एकाच मतदारसंघातून आणि एकाच पक्षाकडून सर्वाधिक अकरा वेळा निवडून आले. ५२ वर्षे त्यांनी आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते.
१९५६च्या सुमारास संयुक्त महाराष्ट्र चळवळीने जोर धरला असता त्यात देशमुख यांनीही झोकून दिले. १९६२ साली देशभरात काँग्रेसचे वर्चस्व असतानाही सांगोला विधानसभा निवडणुकीत शेकापकडून देशमुख उभे राहिले आणि वयाच्या ३४ व्या वर्षी आमदार झाले. आमदारकीचा बहुतांशी काळ ते विधिमंडळात विरोधी बाकावर बसले. १९७८ साली शरद पवार यांच्या पुलोद सरकारमध्ये आणि नंतर १९९९ साली शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला. देशमुख यांनी मंत्रिपदही भूषविले. २०१९मध्ये त्यांनी वृद्धापकाळामुळे निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली. नातू डॉ. अनिकेत चंद्रकांत देशमुख यांना राजकीय वारसदार म्हणून उमेदवारी दिली. परंतु अवघ्या ६७२ मतांनी ते पराभूत झाले. माजी विधान परिषद सदस्य दीपक साळुंखे यांनी देशमुख यांची साथ सोडून शिवसेनेचे शहाजी पाटील यांच्या पाठीशी आपली ताकद लावली. परिणामी, देशमुखांचा अत्यल्प मतांनी पराभव झाला.
गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे सांगोला येथे देशमुख कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आले, त्या वेळी त्यांच्याबरोबर दीपक साळुंखे हेही होते. हा प्रकार देशमुख यांच्या चाहत्यांसह शेकाप कार्यकर्त्यांना पसंत पडला नाही. अशा लोकोत्तर नेत्याचे उचित स्मारक उभारणे ही काळाची गरज आहे.
