चिपळूणमधील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या ग्रंथसंपदेचे महापुरामुळे नुकसान झाले होते. या वाचनालयासाठी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने अडीच हजार ग्रंथसंपदा भेट दिली आहे. ही ग्रंथसंपदा घेऊन जाणाऱ्या वाहनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखविला.
‘वर्षां’ शासकीय निवासस्थानी प्रांगणात झालेल्या कार्यक्रमास मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय पाटील, मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलिंद गवादे, साहित्य व सांस्कृतिक मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी या मराठी भाषा विभागाशी निगडित सर्व संस्थांच्या या पुढाकाराचे कौतुक केले. तसेच त्यांनी भेट देण्यात येणाऱ्या ग्रंथसंपदेची माहिती घेतली.
अतिवृष्टीमध्ये चिपळूण शहरात महापुराचे पाणी शिरल्याने सन १८६४ साली स्थापन झालेल्या व १५७ वर्षांंची परंपरा लाभलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, वाचनालयात वर्षांनुवर्षे जोपासलेल्या अमूल्य अशा ग्रंथसंपदेचे फार मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. वाचनालयातील पुस्तकांचे नुकसान विचारात घेऊन वाचनसंस्कृती वातावरण पूर्वपदावर यावे यासाठी मराठी भाषा विभागाच्या वतीने अडीच हजार पुस्तके देण्यात येत असल्याची माहिती देसाई यांनी दिली.
अनेक वर्षांची समृद्ध वाचन परंपरा असलेल्या या वाचनालयाला मदत व्हावी, वाचकांना पुन्हा पुस्तके वाचनासाठी उपलब्ध व्हावीत आणि वाचनसंस्कृती अखंडितपणे प्रवाहित राहावी, या उद्देशाने वाचनालयाला राज्य मराठी विकास संस्था व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ या कार्यालयांच्या पुढाकारातून मराठी भाषा विभागाकडून वैविध्यपूर्ण विषयांवरील मौलिक अशी अडीच हजार पुस्तके भेट देण्यात आली आहेत.
महापुरामुळे पुस्तकांचे नुकसान
अतिवृष्टीमध्ये चिपळूण शहरात महापुराचे पाणी शिरले होते. या महापुराने सन १८६४मध्ये स्थापन झालेल्या आणि १५७ वर्षांची वाचन परंपरा लाभलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, वाचनालयात वर्षांनुवर्षे जोपासलेल्या अमूल्य अशा ग्रंथसंपदेचे फार मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते.

