करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदीच्या काळात रिक्षातून तीनऐवजी दोन प्रवाशांची वाहतूक करावी लागत होती. यामुळे चालकांकडून तीन प्रवाशांचे भाडे दोन प्रवाशांकडून वसूल केले जात होते. राज्य शासनाने आता टाळेबंदीत शिथिलता आणली असून सार्वजनिक वाहतुकीस पूर्ण क्षमतेने प्रवास करण्यास मुभा मिळाली आहे. यामुळे काही रिक्षाचालकांनी दोनऐवजी तीन प्रवाशांची वाहतूक करण्यास सुरुवात केली असली तरी टाळेबंदीच्या काळात वाढविलेल्या प्रवासी भाडय़ामध्ये कपात केलेली नाही.
वर्तकनगर ते ठाणे स्थानक तसेच लोकमान्यनगर ते ठाणे स्थानक या मार्गावर पूर्वी प्रति प्रवासी २० रुपये, तर नितीन कंपनी ते ठाणे स्थानक या मार्गावर प्रति प्रवासी १२ रुपये आणि सिडको ते कशेळी ३० रुपये भाडे आकारले जात होते; परंतु करोनाकाळात दोन प्रवाशांची वाहतूक करण्यास मुभा मिळाल्यामुळे रिक्षाचालकांनी वर्तकनगर ते ठाणे स्थानक तसेच लोकमान्यनगर ते ठाणे स्थानक प्रति प्रवासी ३० रुपये, तर नितीन कंपनी ते ठाणे स्थानक या मार्गावर प्रति प्रवासी १५ रुपये आणि सिडको ते कशेळी ४० रुपये भाडे आकारले जात आहे.
टाळेबंदी शिथिलीकरणानंतर तीन प्रवासी वाहतूक करण्यास मुभा मिळाली असतानाही मागील वर्षी लागू करण्यात आलेली ही भाडेवाढ रिक्षाचालकांनी सुरूच ठेवली आहे. याकडे ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग आणि ठाणे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. भाडे कमी करण्यासंदर्भात प्रवाशांनी विचारणा केली असता, चालक प्रवाशांसोबत वाद घालतात. प्रवाशांकडून जादा भाडे आकारणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती ठाणे प्रादेशिक परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
शहरात १ सप्टेंबरपासून रिक्षातून तीन प्रवाशांची वाहतूक करण्यास सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे भाडेकपात करण्यात येईल. प्रत्येक रिक्षाथांब्यावर भाडेदरचा फलक लावण्यात येणार आहे. सध्या जे रिक्षाचालक तीन किंवा चार प्रवाशांची वाहतूक करूनही जास्त भाडे आकारत असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.

