शेती सुलभ करणाऱ्या युवकाचा त्याच्याच यंत्राने मृत्यू

शेती सुलभ करणाऱ्या युवकाचा त्याच्याच यंत्राने मृत्यू

सामान्य शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सुलभ कृषी संयंत्र तयार करणाऱ्या एका युवा शेतकऱ्याचा त्यानेच निर्माण केलेल्या यंत्रामुळे अपघाती मृत्यू झाला. हळहळ लावणारी ही घटना गुरुवारी वर्ध्याजवळील मांडवा गावात घडली. विशेष म्हणजे, काही दिवसांआधी यवतमाळमधील अशाच एका प्रयोगशील युवकाचा त्यानेच निर्माण केलेल्या हेलिकॉप्टर चाचणीदरम्यान अपघाती मृत्यू झाला होता.

मांडवा या कृषीप्रधान गावातील अभिजित बंडूजी वंजारी (२०) हा युवक वर्ध्यातील तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेऊन गावात शेती करायचा. शेतकऱ्यांचे श्रम कमी करण्यासाठी नवनवे प्रयोग करण्याचा छंद त्याला जडला. तुरीच्या झाडाची उंच वाढ टाळून त्याच्या आडव्या फांद्या वाढाव्या यासाठी तुरीचे शेंडे कापले जातात.

हे शेंडे कापण्यासाठी अभिजितने बॅटरीवर चालणाऱ्या स्प्रे पंपाचे कापणी यंत्र तयार केले होते. बाजारात या कामासाठी विविध कंपन्यांचे यंत्र उपलब्ध आहे. मात्र अत्यंत कमी खर्चात हे यंत्र तयार करून अभिजितने गावातील अनेक शेतकऱ्यांना ते स्वस्तात विकले. मात्र याच यंत्राने त्याचा घात केला. दुपारी चार वाजता अभिजितवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी मांडव्यासह अन्य गावातील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

दुचाकीवर ट्रॉलीकुलरच्या मदतीने स्प्रिंकलर..

सुधीर बावणे म्हणाले, अभिजित हा अत्यंत प्रयोगशील विद्यार्थी होता. यापूर्वी त्याने शेतातील साहित्य आणण्यासाठी दुचाकीवर ट्रॉली तयार केली होती. त्याचे सर्वत्र कौतुक झाले होते. घरी तयार केलेल्या परसबागेतील रोपटय़ांना पाणी देण्यासाठी त्याने कुलरच्या मदतीने स्प्रिंकलर तयार केले होते. तो  सतत असे प्रयोग करायचा. तुकडोजी महाराजांच्या जयंतीप्रसंगी त्याने केलेली विद्युत रोषणाई बघायला गर्दी झाली होती.

काय झाले ?

शेतात तुरीचे शेंडे खुडण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या यंत्रांपेक्षा खूप स्वस्त यंत्र अभिजितने तयार केले होते. हे यंत्र वापरताना अचानक यंत्राचे पाते तुटून ते अभिजितच्या शरीरात शिरले. त्याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती या कुटुंबाचे स्नेही सुधीर बावणे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *