गेले काही महिने काम सुरू असलेले कळंबोली येथील जम्बो करोना काळजी केंद्राचे काम अखेर सिडकोने पूर्ण केले असून तसे पत्र त्यांनी पनवेल महापालिकेला दिले आहे. या केंद्राचे लवकरच पालिकेकडे हस्तांतरण करण्यात येणार असून तिसऱ्या लाटेत या केंद्राचा मोठा आधार पनवेलकरांना मिळणार आहे.
सिडकोने गेल्या तीन महिन्यांपासून २९ कोटी रुपये खर्च करून कळंबोली येथील केंद्रीय कापूस निगमच्या (सीसीआय) गोदामात ६३५ खाटांच्या या जम्बो करोना केंद्राचे काम काम पूर्ण केले आहे.
रायगड जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १ लाख ६४ हजारांवर पोहोचली असून ४,१४५ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याच्या तुलनेत पनवेल तालुक्यात बाधितांची संख्या ८५ हजारांवर आणि मृतांची संख्या १६०० वर पोहोचली आहे. पनवेल हे जिल्ह्यातील सर्वाधिक बाधित व मृतांचे ठिकाण होत असल्याने येथील महाविकास आघाडीचे नेते आमदार बाळाराम पाटील, बबन पाटील, सतीश पाटील यांनी जम्बो करोना सेंटरची मागणी राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दुसऱ्या लाटेत केली होती. पनवेल पालिकेचे तत्कालीन आयुक्त सुधाकर देशमुख आणि रायगड जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी याबाबतच्या मागणीला दुजोरा दिला होता. हे सेंटर उभारण्याचा खर्च सिडकोने करावा यासाठीचे आदेश नगरविकासमंत्री शिंदे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांना दिले होते. सुरुवातीला तीन महिने जागांची चाचपणी करण्यात गेली. अखेर कळंबोली येथील बंद असलेल्या सीसीआय गोदामातील जागा घेण्यात आली. गोदामातील एक लाख चौरसफुटाच्या जागेवर ६३५ खाटांचे हे केंद्र उभारण्यात आले असून यासाठी सिडकोला तीन महिन्यांचा अवधी लागला. या केंद्रात ५०५ प्राणवायू खाटा, प्रौढांसाठी १०० अतिदक्षता खाटा, बालकांसाठी २५ अतिदक्षता खाटा आहेत, तर २० आणि १३ मे. टन क्षमतेच्या दोन द्रव्य प्राणवायू साठवणूक टाक्या बसविण्यात आल्या आहेत. दोन दिवसांत सुरक्षारक्षक येथे नेमले जाणार आहेत.
सप्टेंबर महिन्यात हे केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने पालिकेने जेवण, औषधे तसेच संबंधित साहित्यांचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांसाठी निविदा जाहीर केली आहे. त्यामुळे पालिकेच्या संबंधित विभागांनी या रुग्णालयावर लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर राहिलेली कामे पूर्ण करून घ्यावीत, असे आदेश आयुक्त देशमुख यांनी गुरुवारच्या बैठकीत दिले.
या वेळी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, साहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, साहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अधिकारी संजय कटेकर, मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
संभाव्य तिसऱ्या करोना लाटेच्या पूर्वतयारीकरिता कळंबोली येथील सीसीआय गोदामांमध्ये ६३५ खाटांचे जम्बो कोविड केंद्र उभारले जात आहे. येत्या काही दिवसांमध्ये सिडको याचे हस्तांतरण पनवेल महानगरपालिकेकडे करणार आहे. या पार्श्वभूमीवरती पाहणी करून योग्य ते नियोजनाच्या सूचना बैठकीत दिल्या आहेत.

