अफगाणिस्तानमधील अशांततेमुळे सांगलीत बेदाणा भडकला

अफगाणिस्तानमधील अशांततेमुळे सांगलीत बेदाणा भडकला

अफगाणिस्तानमधील अशांततमुळे देशांतर्गत बाजारात सांगलीच्या बेदाण्याला किलोला २५ रुपयांनी वाढ मिळाली असून सणामुळे मागणीही वाढली आहे. सध्या चांगल्या प्रतीच्या बेदाण्याला किलोला २४० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.

अफगाणिस्तानमध्ये उद्भवलेल्या युद्धजन्य स्थितीचा बाजारामधील आयात-निर्यातीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. तेथून सुक्यामेव्यातील बेदाण्याची मोठी आवक भारतात होते. विशेषत दसरा, दिवाळी या सणाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये ही आवक केली जाते. या वर्षी अफगाणमधील युद्धजन्य स्थितीमुळे ही आवकच थांबली असल्याने देशी बेदाण्याला मागणी वाढली आहे. यामुळे सांगली व तासगावच्या बाजारात बेदाण्याला चांगला दर मिळत आहे. या आठवडय़ामध्ये बेदाण्याला २४० रुपये किलो असा या हंगामातील सर्वोच्च दर मिळाला. यामध्ये आणखी पाच ते दहा रुपयांची वाढ अपेक्षित असल्याचे व्यापारी सुशील हडदरे यांनी सांगितले.

सध्या जिल्ह्य़ातील ८० ते १०० शीतगृहामध्ये सुमारे ६० हजार टन बेदाणा अद्याप शिल्लक असून सध्या प्रतवारीनुसार १७० ते २४० रुपये किलो असा दर बेदाण्याला मिळत असल्याचे श्री. हडदरे यांनी सांगितले. सांगली व तासगाव बाजारात बेदाण्याचा हंगामही सांगतेकडे पोहोचला असून दिवाळीनंतर नवीन माल येण्याची चिन्हे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *