मध्य रेल्वेच्या तुलनेत पश्चिम रेल्वेला मिळतो नेहमीच पहिला मान

मध्य रेल्वेच्या तुलनेत पश्चिम रेल्वेला मिळतो नेहमीच पहिला मान

लोकलच्या ताफ्यात येणा-या नव्या बम्बार्डियर लोकल, सीसीटीव्ही कॅमेरे, वातानुकूलित लोकल, स्वयंचलित दरवाजे याचा पहिला मान हा नेहमीच पश्चिम रेल्वेला मिळतो. पश्चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वेवरील प्रवाशांची संख्या अधिक आहे.

मात्र तरी देखील जुनाट लोकल आणि अपु-या सोयी-सुविधांचा सामना या मार्गावरील प्रवाशांना करावा लागतो. त्यामुळे येणारी प्रत्येक नवीन सुविधा पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मिळत असल्याने पश्चिम रेल्वे तुपाशी आणि मध्य रेल्वेचे प्रवासी उपाशी अशी प्रतिक्रिया मध्य रेल्वेवरील प्रवासी व्यक्त करीत आहेत.

यापूर्वी मुंबई लोकलच्या ताफ्यात दाखल झालेल्या सिमेन्स लोकल देखील काही काळ वापरल्यानंतर मध्य रेल्वेवर चालवण्यात आल्या. याशिवाय एमयूटीपी-२ या योजनेअंतर्गत येणा-या ७२ नव्या को-या बम्बार्डियर गाडय़ांपैकी सुरुवातीला ४० लोकल मध्य रेल्वेवर आणि ३२ लोकल पश्चिम रेल्वेवर चालवण्यात येणार होत्या. मात्र प्रत्यक्षात या गाडया ताफ्यात दाखल होण्यास सुरुवात झाल्यानंतर सर्व गाडया पश्चिम रेल्वेवर चालवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सुरुवातीला डीसी-एसी परिवर्तनामुळे पहिली बम्बार्डियर पश्चिम रेल्वेवर चालवण्यात येत असल्याचे बोलले जात होते. मात्र मध्य रेल्वेवरील डीसी-एसी परिवर्तन झाल्यानंतरही नवीन बम्बार्डियर लोकल मध्य रेल्वेवर धावणार नसल्याने या मार्गावरील प्रवाशांची घोर निराशा झाली.

याशिवाय भविष्यात मुंबईकरांचा प्रवास गारेगार करण्यासाठी दाखल होणारी वातानुकूलित लोकल देखील पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील प्रवासी मात्र होणा-या या सापत्न वागणुकीवर चांगलेच गरम झाले आहेत. रेल्वेच्या अधिका-यांना याबाबत विचारले असता एकाच प्रकारच्या लोकल ताफ्यात असल्यास देखभाली करता सोयीस्कर जाते.

मोटरमनला देखील गाडी चालवणे सोपे होते. याशिवाय पश्चिम रेल्वेचा मार्ग थेट आहे, प्रवासी संख्या कमी आहे. त्यामुळे नवीन सुविधा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करणे सोपे जाते असे सांगण्यात येते. मात्र रेल्वे अधिका-यांची ही कारणे न पटणारी असल्याचे मत प्रवासी व्यक्त करत आहेत.

महिलांच्या सुरक्षेचा विचार करून काही दिवसांपूर्वी पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. त्यानंतर हे सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच मध्य रेल्वेवर देखील लावण्यात येतील, अशी अपेक्षा प्रवाशांची होती. लोकलमध्ये झालेल्या हल्ल्यांमुळे मध्य रेल्वे मार्गावर दोन महिलांना जीव गमवावा लागला. मात्र असे असतानाही रेल्वे प्रशासनाकडून मध्य रेल्वेवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येण्याची शक्यता अद्यापतरी धूसरच आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेच्या बाबतीतही रेल्वेकडून दुजाभाव केला जात असल्याचे समोर येत आहे.

सध्या, मुंबई उपनगरात १३२ रेल्वे स्थानके कार्यरत आहेत. त्यामधील ३५ स्थानके पश्चिम रेल्वेवर तर मध्य रेल्वेवरील मेन लाईनवर ४९ स्थानके आहेत, तर हार्बर मार्गावर ३२ स्थानके आणि ट्रान्स हार्बर मार्गावर १६ स्थानके आहेत.

याशिवाय पश्चिम रेल्वेवर ७५ आणि मध्य रेल्वेवर १२१ गाडया दररोज धावतात. प्रवासी संख्येचा विचार केल्यास एकूण ७५ लाख प्रवाशांपैकी पश्चिम रेल्वेवर ३५ लाख प्रवासी तर मध्य रेल्वे मार्गावर ४० लाख प्रवासी दैनंदिन प्रवास करतात. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा भार अधिक असूनही नव्याने मिळणा-या सर्व सुविधांचा मान केवळ पश्चिम रेल्वेलाच दिला जात असल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांमधून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *