रविवार हा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हक्काचा सुट्टीचा दिवस. मात्र रक्षाबंधनाचा उत्सव नेमका सुट्टीच्या दिवशी आला. या उत्सवाचे भावनिक महत्त्व लक्षात घेऊन टपाल खात्याच्या कर्मचा?ऱ्यांनी आज सुट्टीच्या दिवशीही कामावर येऊन बहीण—भावाचे भावनिक नाते जोडण्यात हातभार लावत नागरिकांना सुखद अनुभव दिला.
पोस्टमनने आज सुट्टीच्या दिवशी कामावर येत सुमारे ३ हजारावर टपालाद्वारे राख्यांचे वितरण केले. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी राखी मिळेल की नाही, याच्या प्रतीक्षेत असलेल्या भावांना रक्षाबंधन साजरे करता आले.
बहीण भावाच्या अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणजे राखी. यावर्षी रक्षाबंधन नेमके रविवारी आले. त्यामुळे बहिणीने पाठवलेल्या राख्या भावापर्यंत वेळेवर पोहोचवण्याची मोठी जबाबदारी टपाल खात्यावर आली. शनिवापर्यंत टपाल कार्यालयात आलेल्या सर्व राख्या पोचवण्यात आल्या होत्या. परंतु रविवारी साप्ताहिक सुट्टी असूनही टपाल खात्याने रविवारी देखील आलेल्या सर्व राख्या पोचवण्याची जबाबदारी पार पाडली.
नगर जिल्ह्यातील सर्व पोस्टमन हे रविवारी कर्तव्यावर होते. टपाल कार्यालयात आलेले सर्व राखी टपाल त्यांनी वितरीत केले. जेणेकरून बहिणीने पाठविलेली राखी भावापर्यंत सणाच्याच दिवशी मिळेल. जर रविवारी या राख्या वितरित केल्या नसत्या तर त्या राख्या सोमवारी द्याव्या लागल्या असत्या. परंतु रक्षाबंधनाचे महत्त्व निघून गेले असते, ही भावनिक बाब लक्षात घेऊन रक्षाबंधन सणा दिवशीच सर्व राख्या पोहोचवण्याची जबाबदारी टपाल खात्याने पार पाडली. एसटी महामंडळानेही टपाल बॅगांची वाहतूक रविवारीदेखील केली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये टपाल पोहोचवता आले.
याबद्दल टपाल खात्याच्या पोस्टमास्टर जनरल (पुणे) मधुमिता दास व नगर विभागाचे वरिष्ठ अधीक्षक एस. रामकृष्णा यांनी सर्व पोस्टमन कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
काही लोक शनिवापर्यंत राखीची वाट पाहत होते. परंतु शनिवारीपर्यंत राखी न मिळाल्याने ते निराश झाले होते व त्यांच्या बहिणीने पाठवलेली राखी या वर्षी सणाच्या दिवशी मिळणार नाही, असे त्यांना वाटत होते. परंतु अचानक रविवारी पोस्टमनने घरी येऊन राखी दिली त्याचा त्यांना सुखद धक्का बसला व त्यांनी टपाल खात्याचे, पोस्टमनचे आभार मानले. जिल्ह्यामध्ये रविवारी राखीचे टपाल वितरण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली होती व त्यानुसार सुमारे ३ हजार राख्यांचे वाटप रविवारी करण्यात आल्याची माहिती डाक निरीक्षक संदीप हदगल यांनी दिली.