देशात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा ऑक्टोबरमध्ये उच्चांक; लहान मुलांना अधिक धोका

देशात करोनाच्या तिसऱ्या लाटेचा ऑक्टोबरमध्ये उच्चांक; लहान मुलांना अधिक धोका

देशातला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर संपतो न संपतो तोच आता तिसऱ्या लाटेचीही भीती सतावू लागली आहे. ह्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची माहिती समोर येत असल्याने पालकांच्या काळजीत भर पडली आहे. अशातच आता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या तज्ज्ञांच्या समितीने या तिसऱ्या लाटेसंदर्भात महत्त्वाचा इशारा दिला आहे.

करोनाची तिसरी लाट ऑक्टोबर महिन्यात उच्चांक गाठू शकते असा इशारा या समितीने दिला आहे. या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याचंही या समितीकडून सांगण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार, या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालात म्हटलं आहे की, ज्या प्रमाणात लहान मुलांना करोनाची लागण होऊ शकते, त्या प्रमाणात आपल्याकडे आत्ता पुरेशा आरोग्यसुविधा उपलब्ध नाहीत. हा अहवाल पंतप्रधान कार्यालयाकडेही पाठवण्यात आलेला आहे.

सहव्याधी असलेल्या तसंच दिव्यांग असलेल्या लहान मुलांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात यावे अशी सूचनाही या अहवालात केलेली आहे. कितीही खबरदारी घेतली तरीही करोनाची तिसरी लाट ही ऑक्टोबर अखेरपर्यंत येण्याची शक्यता आहेच, असंही या समितीकडून सांगण्यात आलं आहे.

लहान मुलांचं लसीकरण अद्याप झालेलं नाही, ह्या मुद्द्यावर अनेक तज्ज्ञांसोबत चर्चा करण्यात आली. त्यातून असं लक्षात आलं आहे की, लहान मुलांवर करोना विषाणूचा अतिगंभीर परिणाम होणार नसला तरीही ह्या मुलांमुळे इतरांमध्ये करोनाचा फैलाव होऊ शकतो. तसंच करोनाची तिसरी लाट ही इतर दोन लाटांपेक्षा सौम्य स्वरुपाची असेल अशीही माहिती या अहवालाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *