मुंबई महानगराला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील तानसा, मोडकसागर धरणांपाठोपाठ आता भातसा धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहे. भातसा धरण परिसरातील पावसाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन धरणाचे दोन दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले आहेत. यामधून १२४६ .२६ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग होत असल्याने भातसा नदीकाठी वसलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरवषी जलपूजनाचा कार्यक्रम केल्यानंतर भातसा धरणाचे दरवाजे उघडण्यात येतात. त्यानुसार आमदार दौलत दरोडा, माजी आमदार पांडुरंग बरोरा, भातसा धरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील, सहाय्यक अभियंता श्याम हंबीर आदींच्या उपस्थितीत जलपूजनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले.
भातसा धरण परिसरात आत्तापर्यंत एक हजार ९२३ मिमी इतका पाऊस झाला आहे. धरणातील पाणीसाठा ८६३. ९८१ द.ल.घ.मी. इतका असून धरणाच्या पाण्याची पातळी १३७.८५ मीटर एवढी आहे. पातळी नियमित करण्यासाठी पाच दरवाजांपैकी एक व पाच क्रमांकाचे दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले. नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने सापगाव पूल तसेच सापगाव, खुटघर, बामणे, साजीवली, खुटाडी, भातसई या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.