राज्य शासन व शासकीय यंत्रणेने करोना प्रतिबंधासाठी लागू असलेले निर्बंध उठवण्याचा सपाटा लावला असताना, सातारा जिल्ह्यात करोना रुग्ण निष्पन्नता दर घटल्याचे दिसत असले तरी करोनाबळींची संख्या झेपावल्याने येथील नेमक्या परिस्थितीचा आढावा घेऊन समाजहिताचे निर्णय घेण्याची गरज व्यक्त होत आहे. जिल्ह्यात काल शनिवारी उच्चांकी ५४, तर आज रविवारी ४३ करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने समाजमन सुन्न झाले आहे.
रविवारच्या ताज्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात ६९२ करोनाबाधितांची वाढ होताना, ४३ बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर, केवळ २१६ करोनाबाधित उपचारांती रुग्णालयातून सुखरूप बाहेर पडले आहेत. नव्याने निष्पन्न करोनाबाधितांची सर्वाधिक १३६ ही जिल्हा प्रशासनाचे मुख्यालय असलेल्या साताऱ्यातील असून, त्याखालोखाल खटावमध्ये १०८, कोरेगावात १०४, फलटणमध्ये १०० तर कराड तालुक्यात ९९ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. करोनाबळींच्या नव्या आकडेवारीत फलटणला १८, त्या खालोखाल सातारला १२, कराडला ४, खटावला ३ तर पाटण व खंडाळा तालुक्यात प्रत्येकी २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जावली व माण तालुक्यात प्रत्येकी एक करोनाबळी जाताना, मात्र कोरेगाव, महाबळेश्वर व वाई तालुक्यात एकाही करोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही. दरम्यान मंदिरे, शाळा यांची टाळेबंदी वगळता अन्य दुकाने, संस्था, अस्थापना नियम व अटींच्या चौकटीत पूर्णवेळ सुरू आहेत. मात्र, करोना प्रतिबंधासाठीच्या नियम, अटींचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे दिसत असल्याने वैद्यकीय क्षेत्राबरोबरच सजग नागरिकांमधून चिंता व्यक्त करताना, ही परिस्थिती अशीच राहिल्यास करोना संसर्ग फोफावण्याला वेळ लागणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर, याचवेळी करोनाबळींची संख्या धक्कादायकरित्या वाढत असल्याने ही एकंदर परिस्थिती शासन व प्रशासनाने गांभीर्याने घेऊन उपाययोजना लागू करण्याची गरज जाणकारांकडून व्यक्त होत आहे.