वाडा तालुक्यातील मौजे मेट येथील पेल्टटेक हेल्थ केअर या औषध निर्माण करणा-या कंपनीचे वाढीव बांधकाम करीत असताना स्लॅब कोसळल्याने दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या दुर्घटनेत चार जण गंभीर जखमी झाले असुन त्यांच्यावर खुपरी येथील कल्याणी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वाडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कारखान्यांचे जाळे पसरलेले आहे. अनेक व्यावसायिक कारखान्यांचे वाढीव बांधकाम करीत असतात. मेट येथील पेल्टटेक हेल्थकेअर या जुन्या कंपनीमध्ये वाढीव बांधकाम भरपावसात सुरु होते. विशेष म्हणजे या बांधकामाचा ठेकेदार व काम करणारे मजूर हे परप्रांतीय असल्याने संध्याकाळी उशिरापर्यंत या अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या व जखमी झालेल्या मजुरांची नावे पोलीसांनाही कळविण्यात आली नव्हती.
दरम्यान वाडा पोलीस या अपघाताची चौकशी करीत असुन दोषींवर लवकरच कारवाई करण्यात येईल असे वाडा पोलीसांनी सांगितले.
दरम्यान परप्रांतीय ठेकेदार मजुरांची नोंदणी येथील गवंडी बांधकाम संघटनेकडे करीत नसल्याने अचानक झालेल्या अपघातांमध्ये मजुरांना मदत करणे कठीण जाते असे वाडा तालुका गवंडी,मजुर संघटनेचे अध्यक्ष भिमराव बागुल यांनी सांगितले.