अवैध गर्भपाताच्या गोपनीय माहितीवरून जिल्हा शल्यचिकित्सकांच्या पथकाने वाशीम शहरातील एका दवाखान्याची अचानक तपासणी केली. या ठिकाणी दाखल असलेल्या एका महिलेवर गर्भपातासाठी अवैधपणे उपचार करण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने डॉक्टरसह दोघांना वाशीम शहर पोलिसांनी अटक केली आहे.
गर्भधारणापूर्व तसेच प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान, अवैध गर्भपात करणे पीसीपीएनडीटी कायद्यान्वये गुन्हा आहे. वाशीम जिल्ह्यात असे प्रकार घडत असल्यास याची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले होते. मदत क्रमांकावर प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या चमूने १८ ऑगस्टला सायंकाळी डॉ. शशिकांत सारसकर याच्या दवाखान्यावर अचानक धाड टाकली. या दवाखान्यात हिंगोली जिल्ह्यातील एक ४० वर्षीय महिला गर्भपातासाठी १८ ऑगस्टला सकाळी १० वाजतापासून भरती असल्याचे व तिच्यावर गर्भपातासाठी उपचार करण्यात आल्याचे आढळून आले. त्या महिलेकडे हिंगोली येथील निदान इमेजिंग सेंटरमधील सोनोग्राफी रिपोर्ट आढळून आला. आरोग्य चमूने या महिलेची तपासणी केल्यानंतर ही महिला २४ आठवडय़ांची गर्भवती असल्याचे व तिची प्रसूतीची क्रिया सुरू झाल्याचे आढळून आले. चौकशीमध्ये महिलेच्या गर्भपातासाठी बोगस डॉक्टर विलास ठाकरे याने उपचार केल्याचे सांगण्यात आले. दवाखान्याची झाडाझडती घेत असताना बोगस डॉक्टर विलास ठाकरे याच्याकडे गर्भपातासाठी आवश्यक असणारी औषधे आढळून आली. याप्रकरणी वाशीम शहर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून डॉ. शशिकांत सारसकर व विलास ठाकरे या दोघांना अटक करण्यात आली आहे.
गर्भपाताचे उपचार करण्यात आलेल्या महिलेला जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले असून सुरक्षित गर्भपातानंतर महिलेची प्रकृती चांगली असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितले.