बीड, नगर, सोलापूरमध्ये रुग्णवाढ

राज्यात करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी गेल्या आठवडय़ात पुन्हा किंचित रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून येत आहे. यात प्रामुख्याने सोलापूर, बीड आणि नगर या जिल्ह्य़ांमध्ये रुग्णवाढ होत असल्याचे आढळले आहे.

राज्यात प्रतिदिन नव्याने आढळणाऱ्या रुग्णसंख्येचा आलेख जून महिन्यात सुमारे नऊ ते दहा हजारांदरम्यान होता. राज्याच्या अन्य भागात संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग आणि पुणे या जिल्ह्य़ांमध्ये दुसऱ्या लाटेचा प्रभाव अधिक काळ राहिला. जुलैच्या अखेरीस प्रतिदिन रुग्णसंख्येचा आलेख सात हजारांपेक्षा कमी झाला. बाधितांचे प्रमाणही या जिल्ह्य़ांमध्ये नऊ टक्कय़ांच्या खाली आले आहे.

कोल्हापुरात मनपा क्षेत्रात रुग्णवाढ कमी झाली तरी ग्रामीणमध्ये मात्र गेल्या आठवडय़ाच्या तुलनेत रुग्णसंख्या १,९०५ वरून २,९१७ वर गेली आहे. सांगलीमध्ये हीच स्थिती असून मनपामध्ये रुग्णसंख्या वाढ दिसत नसली तरी ग्रामीण भागात मात्र ही आठवडाभरात रुग्णसंख्या जवळपास पाचशेने वाढली आहे.

चिंताजनक स्थिती असलेल्या जिल्ह्य़ांमधील संसर्गाचा प्रादुर्भाव नियंत्रणाखाली येत असताना २३ ते २९ जुलै आणि ३१ जुलै ते ५ ऑगस्ट या दोन आठवडय़ांच्या तुलनेत सोलापूर, नगर आणि बीडमध्ये संसर्गप्रसार वाढला. औरंगाबादमध्येही रुग्णवाढ झाली असून ग्रामीण भागात ही वाढ अधिक आहे. बुलढाण्यातही रुग्णवाढ होत असल्याचे आढळले आहे. डेल्टाचा उगम झालेल्या अमरावतीमध्येही  रुग्णवाढ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *