बदलापुरात आज वीजपुरवठा बंद

जुलै महिन्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीनंतर तात्पुरत्या स्वरूपात केलेली डागडुजी कायमस्वरूपाची करण्यासाठी बदलापुरातील वीजपुरवठा शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. पूर्व आणि पश्चिम असा दोन्ही भागातील वीजपुरवठा बंद ठेवला जाणार असल्याने नागरिकांना सात तास विजेविना काढावे लागणार आहेत.

बदलापूर शहरात २२ जुलै रोजी उल्हास नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका बसला. या पुराच्या पाण्यात पश्चिम भागातील अनेक विद्युत खांब, रोहित्रे पाण्याखाली गेली होती. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्यांना घर्षण झाल्याने वीजवाहिन्या नादुरुस्त झाल्या होत्या. मात्र त्या वेळी ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून महावितरणने तातडीने तात्पुरत्या स्वरूपाची दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरळीत केला होता. मात्र अनेक ठिकाणी कायमस्वरूपी दुरुस्तीची कामे शिल्लक होती. त्यामुळे ही कामे करण्यासाठी महावितरणने शनिवारचा दिवस निवडला आहे. बदलापूर शहराला अंबरनाथ येथील मोरिवली व चिखलोली येथील एम्पायर येथील उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो. या केंद्रांतून वीजपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

बदलापूर पश्चिमेतील हेंद्रेपाडा, रमेशवाडी, समर्थनगर, टाटा कॉलनी, बॅरेज रस्ता, अंजलीनगर, यादवनगर, सोनिवली, मांजर्ली, बेलवली, जाधव कॉलनी, दत्ता चौक, शाश्वत पार्क, वडवली, साई वलिवली, एरंजाड, पोखरकरनगर, मोहनानंदनगर, शनीनगर, शांतीनगर, सर्वोदयनगर, गणेशनगर, गणेश चौक, बदलापूर गाव, चिखलोली तसेच अंबरनाथ तालुक्यातील बारवी धरणापर्यंतच्या गावांतील वीजपुरवठा बंद राहील. बदलापूर पूर्वेतील डॉ. आंबेडकर चौक, मोहन पाल्म, कुल ब्रिज, वर्धमान हाइट्स, कीर्ती पोलीस लाइन, ताराबाई संकुल, आदित्य विश्व, कात्रप जुना रस्ता, सूर्याविहार, घोरपडे चौक, चैतन्य संकुल,  शिरगाव, आपटेवाडी, यादवनगर, समर्थनगर, भोसलेनगर या परिसरात वीजपुरवठा बंद असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *