दारूभट्ट्यांवर आता ड्रोनची नजर

दारूभट्ट्यांवर आता ड्रोनची नजर

ठाणे खाडीमध्ये खारफुटी आणि वन विभागाच्या जागेत बेकायदा सुरू असलेल्या दारूभट्ट्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाला जिल्हा नियोजन निधीतून ७० लाख रुपयांचे ड्रोन मिळाले आहेत. हा ड्रोन पाच किलोमीटर लांब अंतरापर्यंतचा भाग अगदी सुस्पष्ट दाखवू शकतो. त्यामुळे ठाणे खाडीतील देसाईगाव तसेच कल्याण येथील मलंगगड परिसरातील डोंगराळ भागात राजरोसपणे सुरू असलेल्या दारूभट्ट्यांवर कारवाई करणे सोपे जाणार आहे. तसेच तस्करांची ओळख पटविणेही उत्पादन शुल्क विभागाला शक्य होणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील काही ग्रामीण भागात तसेच चाळींमध्ये दारू तस्करांच्या टोळ्या कार्यरत झाल्या आहेत. या तस्करांकडून ठाणे खाडीतील खारफुटींची कत्तल करून खारफुटींच्या आतमध्ये किंवा जंगलाच्या भागात दारूच्या भट्ट्या चालविल्या जात आहेत. या दारूभट्ट्यांवर कारवाई करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाला खाडीमध्ये बोटीतून तर डोंगराळ, जंगलाच्या भागात पायी जावे लागत असते. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी याठिकाणी पोहचण्यापूर्वीच तस्कर या ठिकाणाहून पळ काढत असतात. त्यामुळे कारवाईत केवळ दारू आणि त्यासाठी लागणारे साहित्य नष्ट केले जात असते. यातील आरोपींना पकडणे शक्य होत नाही. अनेकदा कारवाईची माहिती छुप्या पद्धतीने तस्करांना मिळत असते. या सर्व घटनांवर आळा घालण्यासाठी काय करता येईल याचा विचार उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू होता. त्यानुसार ड्रोनद्वारे कारवाई करण्याचा निर्णय ठाणे उत्पादन शुल्क विभागाने घेतला होता. उत्पादन शुल्क विभागाने त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.

जिल्हा नियोजन निधीतून ठाणे उत्पादन शुल्क विभागाला ७० लाख रुपयांचे ड्रोन मिळाले आहेत. हे ड्रोन दीड किलोमीटरपर्यंत उंच उडू शकतात. तसेच पाच किलोमीटर लांबपर्यंतचे अंतर सहज टिपू शकतात. तसेच कारवाईची नोंदही उत्पादन शुल्क विभागाकडे पुरावा म्हणून उपलब्ध राहणार असून त्याचा उपयोग आरोपींविरोधात कठोर कारवाईसाठी होण्याची शक्यता आहे.

उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी दारूभट्ट्यांच्या परिसरात जाऊन ड्रोन उडवतील. हा ड्रोन पाच किलोमीटरचे अंतर टिपतो. ज्या ठिकाणी हा ड्रोन जाईल, त्याचे प्रक्षेपण थेट अधीक्षकांना त्यांच्या संगणकावर कार्यालयामध्ये बसून पाहता येणार आहे. ड्रोनमुळे तस्कर कुठल्या दिशेने पळून जात आहे. याची माहिती मिळणार आहे. तसेच अनेकदा उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी आणि दारूभट्ट्या चालविणाऱ्यांचे लागेबांधे असल्याचा आरोप केला जातो त्यालाही आळा बसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *