मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज तळीये गावात; गावकऱ्यांशी साधणार संवाद

माळीण दुर्घटनेची आठवण देणारी घटना गुरुवारी रायगड जिल्ह्यात घडली. अतिवृष्टी झाल्याने महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळली. दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली ३५ पैकी ३२ घरं गाडली गेली. कालपासून (२३ जुलै) तळीयेत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून, मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. दरम्यान, दरड कोसळून दुर्घटनाग्रस्त झालेल्या तळीये गावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेट देणार आहेत. दुपारी ते गावकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तळीये गावात गुरुवारी घटना घडली, मात्र पूरपरिस्थिती आणि संपर्क यंत्रणा कोलमडल्याने दुर्घटनास्थळी वेळेवर मदत पोहोचू शकली नाही. शुक्रवारी सकाळी पुराचे पाणी ओसरू लागल्यानंतर मदतकार्य सुरू करण्यात आलं. तोपर्यंत मृतांचा आकडा वाढला.

मुसळधार पाऊस कोसळत असतानाच तळीये गावातील ३२ घरांवर दरड कोसळली. या घटनेत आतापर्यंत ४० लोक मरण पावले आहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत. दरडीखाली अख्खं गावच गडप झालं. त्यामुळे गाव शोकसागरात बुडालं आहे. अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावकऱ्यांचं सांत्वन करण्यासाठी मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे आज (२४ जुलै) दुपारी तळीये गावात जाऊन या भागाची पाहणी करणार आहेत. तसंच गावकऱ्यांशी संवादही साधणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी १२ वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना होतील. त्यानंतर महाड येथील एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचतील. नंतर ते वाहनाने तळीये गावासाठी रवाना होतील. दुपारी १.३० वाजता तळीये येथे पोहचून ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करतील. त्याचबरोबर ग्रामस्थांशी संवाद साधतील. दुपारी ३.२० वाजता ते परत महाडला येतील. नंतर मुंबईकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *