राजावाडी रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश

चेंबूरमधील दुर्घटनेला १६ तास उलटून गेले तरीही रविवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत मृतदेह घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात आणले जात होते.

‘घटना घडल्याचे समजल्यावर धावतच रात्री एक वाजता बहिणीच्या घराकडे धावत सुटले. परंतु वरती कोणीच जाऊ देत नव्हते. रात्री अडीचच्या सुमारास बहिणीच्या मुलीचा मृतदेह मिळाला आणि पायाखालची जमीन सरकली. तसेच जड पावलाने मी रात्री तीन वाजता राजावाडीमध्ये आले.

त्यानंतर बहीण, तिचा दहा वर्षांचा मुलगा यांचे मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले.  सायंकाळी चार वाजले तरी अजून बहिणीच्या पतीचा मृतदेह मिळालेला नाही. एका रात्रीत सारं संपून जाईल, असा विचारही आला नव्हता’, असे वैशाली गवळी (मृत शीला पारधे (४०) यांची बहीण) यांनी सांगितले.

मला एका नातेवाईकांनी बातमी बघून फोन केल्यावर समजले तशी धावत चेंबूरला गेले. माझा एकच भाचा आता राहिला आहे. भाऊ, त्याची बायको, मुलगी सगळे कुटुंब गेले, असे भाच्याला पोटाशी धरून राहिलेल्या एका महिलेने सांगितले.

नातेवाईक सायंकाळपर्यंत ताटकळत

काही वेळाने रुग्णवाहिका रुग्णालयाच्या आवारात दाखल होताच नातेवाईकांचा काळजाचा ठोका चुकत होता. आपले कु णी नसल्याची खात्री झाली की निमूटपणे ही गर्दी पांगली जायची. एखादा ओळखीचा मृतदेह आला की नातेवाईकांच्या हंबरडय़ाने रुग्णालयातील इतर नातेवाईकांचाही बांध फुटायचा. आक्रोश, मागे राहिलेल्यांची चिंता, इतक्या वर्षांंनी उभे केलेले संसार मातीमोल झाल्यानंतर पुन्हा उभे राहण्यासाठी धीर देणारे हात एकीकडे दिसत होते, तर दुसरीकडे ओळख पटवून शवविच्छेदनासह सर्व  प्रक्रिया पार पाडून मृतदेह लवकर ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांची कसरत सुरू होती.

तीन जखमींवर उपचार

चेंबूरच्या दुर्घटनेत सात जण जखमी झाले असून तीन जण सध्या राजावडी रुग्णालयात दाखल आहेत. लक्ष्मी गंगावणे (४०) आणि त्यांची मुलगी विशाखा गंगावणे (१५) यांना डोक्याला मोठी दुखापत झाली. अक्षय झिमूर (२६) याच्या पायाला जखमा झालेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *