ठाणे आयुक्तालय क्षेत्रात १० हजार किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांचा दंड थकविणाऱ्या १ हजार १७ वाहनचालकांच्या घरी जाऊन ठाणे पोलिसांनी नोटिसा बजाविल्या आहेत. नोटीस बजावल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत पोलिसांनी ९ लाख ७८ हजार ८०० रुपयांच्या दंडाची वसुली केली. नोटीस बजावल्यानंतर ठरावीक मुदतीत थकीत दंड भरला नाही तर संबंधित वाहनचालकाला न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
नागरिकांना शिस्त लागावी तसेच दंडात्मक कारवाईला वेग यावा यासाठी फेब्रुवारी २०१९ पासून ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ई-चलान प्रणालीने दंडवसुली करण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांच्या वाहन क्रमांकाचे छायाचित्र काढून दंड आकारण्यात येतो. या दंडाची माहिती थेट वाहनचालकाच्या मोबाइल क्रमांकावर जात असते. त्यानंतर चालकाने दंडाची रक्कम ऑनलाइन पद्धतीने केव्हाही भरण्याची मुभा असते. त्यामुळे अनेकजण दंडाची रक्कम भरत नाही. काही वाहनचालक वारंवार नियमांचे उल्लंघन करत असतात. त्यामुळे दंडाच्या रकमेमध्ये वाढ होत जाते. त्यामुळे ठाणे वाहतूक शाखेने १० हजार किंवा त्यापेक्षा अधिक दंडाच्या रक्कम थकीत असलेल्या वाहनचालकांची यादी तयार केली होती. त्यानंतर पोलिसांनी प्रादेशिक परिवहन विभागाच्या मदतीने वाहनचालकांची नावे, पत्ते मिळविले.
ठाणे प्रादेशिक परिवहन क्षेत्रात ३ हजार ४५१ वाहनचालकांकडे १० हजार किंवा त्यापेक्षाही अधिक रकमेचा दंड थकीत असल्याचे समोर आले. त्यापैकी १ हजार २६९ वाहनचालक हे ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील आहे. १ जुलैपासून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अशा वाहनचालकांच्या निवासस्थानाचा शोध घेऊन त्यांना नोटिसा बजावत आहेत.
पोलिसांच्या नोटीसनंतर काही वाहनचालकांनी दंडाची रक्कम भरली. त्यानुसार ९ लाख ७८ हजार ८०० रुपयांचा थकीत दंड पोलिसांनी वसूल केला.
नोटीस बजावलेल्या वाहनचालकांची संख्या
विभाग वाहनचालक
ठाणे ३९३
भिवंडी ४८१
कल्याण-डोंबिवली ७६
उल्हासनगर ६७
एकूण १०१७
वाहनचालकांकडे मोठय़ा प्रमाणात थकीत दंड आहे. त्यामुळे १० हजार किंवा त्यापेक्षा अधिकचा दंड न भरणाऱ्या वाहनचालकांना आता घरी जाऊन नोटिसा देण्यात आल्या.
– बाळासाहेब पाटील, उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा.
