बकरी ईदनिमित्ताने भिवंडी, मुंब्रा पोलीस सज्ज

करोनामुळे लागू करण्यात आलेल्या र्निबधांमुळे मुस्लीम बांधवांना साधेपणाने बकरी ईद उत्सव साजरे करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. त्यानुसार नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील भिवंडी आणि मुंब्रा शहरात पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.

भिवंडी, मुंब्रा शहरात मशिदीमध्ये नमाज पठण होणार नाही. यासाठी पोलिसांनी मशिदींबाहेर बंदोबस्त तैनात केला आहे. तर भिवंडी शहरातील तात्पुर्त्यां स्वरूपात उभारण्यात आलेल्या ३८ कत्तलखान्यांमध्ये नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून पोलीस पथके तैनात केली आहेत.

बजरंग दल आणि मुस्लीम संघटनांचीही पोलिसांनी बैठक घेऊन त्यांना शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले आहे. भिवंडी आणि मुंब्रा या दोन्ही शहरात सुमारे १४०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

राज्यात करोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्बंध लागू आहेत. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करणे टाळावे असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. मुस्लीम बांधवांचा बकरी ईद हा सण येत्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे.

ठाणे आयुक्तालय क्षेत्रातील भिवंडी आणि मुंब्रा शहरात मोठय़ा प्रमाणात मुस्लीम बांधव राहतात. भिवंडीत सुमारे १०० हून अधिक मशिदी आहेत. तर सुमारे १२ लाख मुस्लीम बांधवांची या ठिकाणी लोकसंख्या आहे.

शहरातील मशिदीत नागरिकांनी येऊन नमाज पठण करू नये म्हणून मशिदी परिसरात तपासणी नाके उभारण्यात आले आहे. गेल्या आठवडय़ाभरापासून भिवंडीतील बजरंग दलाचे कार्यकर्ते, शांतता समितीतील नागरिक आणि मुस्लीम समुदायातील मौलानांची एकत्रित बैठक घेण्यात येत आहे. त्यांना शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन केले जात आहे.

गोवंश हत्येप्रकरणातील आरोपी, दंगलखोर अशा ७८ गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. भिवंडी महापालिकेने शांतीनगर, निजामपुरा, नारपोली, भोईवाडा भागात तात्पुरत्या स्वरूपात ३८ कत्तलखाने उभारले आहेत. या ठिकाणी बकरींची कुर्बानी देण्यात येऊ शकते. नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी कत्तलखान्यांच्या परिसरातही पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. कत्तलखान्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात येणार आहेत. कुर्बानी झाल्यानंतर कत्तलखान्यांमध्ये होणारा कचरा भोईवाडा येथील कचराभूमीत नष्ट केला जाणार आहे. सुमारे १३०० पोलिसांचा फौजफाटा संपूर्ण भिवंडी शहरात तैनात असणार आहे, असे भिवंडी पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *