कार घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा पतीकडून तगादा; महिलेने उचलले धक्कादायक पाऊल

पतीच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याचा प्रकार ठाण्यातील कोलशेत परिसरात समोर आला आहे. पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केले असून या प्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आत्महत्या केलेली महिला ठाण्यातील कोलशेत रोड परिसरात राहत होती. तिचे वय ३२ वर्षे असून तिला तिचा पती दारूच्या नशेत वारंवार मारहाण करत असे. शिवाय फ्लॅट आणि नवीन कार घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादाही पतीने तिच्याकडे तगादा लावला होता. तसेच त्याने केलेल्या शारिरीक आणि मानसिक छळाला कंटाळून तिने २७ जून रोजी घरातील बेडरूममध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिचा १ जुलै रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. उस्मानाबाद येथे राहणाऱ्या तिच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच आरोपीला पोलिसांनी तत्काळ अटकही केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *