तरुणीच्या खुनाच्या आरोपावरून तरुणाला जन्मठेपेची शिक्षा

चुलत बहिणीचा खून केल्याच्या आरोपावरून जिल्हा सत्र न्यायालयाने मारुती अर्जुन ठोकळ (५०, कामरगाव, नगर) याला जन्मठेप व ५० हजार रुपये दंडाची व दंड न दिल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे मृत्यूपूर्वी तरुणीचे ४ जवाब नोंदवले गेले होते. त्यातील तिसरा मृत्यूपूर्व जबाब फिर्याद म्हणून ग्राह्य धरण्यात आला.

जिल्हा सत्र न्यायाधीश माधुरी बरालिया यांनी आज, गुरुवारी खटल्यातील सुनावणीत हा निकाल दिला. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील केदार केसकर यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी, सहायक पोलीस उपनिरीक्षक सोनवणे व हवालदार पी. पी. रोकडे यांनी साहाय्य केले. खटल्यात एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले.

फिर्यादीनुसार मारुती ठोकळ याची, त्याच्या चुलत बहिणीवर वाईट नजर होती. तिचा विवाह होऊ नये म्हणून तो सारखा त्रास देत होता. दि. २० मार्च २०१६ रोजी तिचे आजोबा, आई, वडील शेतात तर भाऊ एमआयडीसीतील कंपनीत कामावर गेला. त्या वेळी मारुती ठोकळ तिच्या घरी आला व मी फोन केल्याचे वडिलांना का सांगते, असे सांगून वाद घालू लागला. त्यांच्यामध्ये झटापट झाली. त्यानंतर मारुतीने तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले.

तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर त्यानेच तिच्या अंगावर घोंगडी टाकून विझवला व नंतर सुपा येथील खासगी रुग्णालयात नेले. परंतु या रुग्णालयाने दाखल करून घेण्यास नकार दिल्याने तिला नगर शहरातील खासगी रुग्णालयात आणले. तिचा प्रथम नगर तालुका पोलिसांनी व नायब तहसीलदारांनी जबाब नोंदवला. उपचारानंतर तिला थोडे बरे वाटू लागल्यानंतर दि. २६ मार्चला तिचा पुन्हा पोलिसांनी व पुरवठा निरीक्षक अधिकाऱ्यांनी जबाब नोंदवला. तिचा दि. १ एप्रिल २०१६ रोजी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या खटल्याचा तपास तत्कालीन प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *