काँग्रेसच्या रॅलीत करोना नियमांची पायमल्ली

इंधन व गॅसवाढीच्या निषेधार्थ नवी मुंबई काँग्रेसच्या वतीने गुरुवारी पालिका मुख्यालय ते कोकणभवन सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड आणि मंत्री अस्लम शेख यांच्यासह नवी मुंबईतील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र रॅलीत आंदोलकांनी परवानगीपेक्षा जास्त सायकली वापरल्याने पोलिसांनी कारवाई करीत सायकली जप्त केल्या. तर करोना नियमांची पायमल्ली केल्याने आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

रॅलीसाठी फक्त दहा सायकलींना परवानगी देण्यात आली होती. मात्र आंदोलकांनी यापेक्षा अधिक सायकलींचा वापर करण्यात आला. पोलिसांनी ३५ पेक्षा अधिक सायकली जप्त केल्या.

पेट्रोलने शंभरी पार केली असून डिझेल व घरगुती गॅसचे दर वारंवार वाढत आहेत. या दरवाढीच्या निषेधार्थ नवी मुंबई काँग्रेसने आता नागरिकांना सायकल हाच पर्याय असल्याने या सायकल रॅलीचे आयोजन केले होते.

या रॅलीला संबोधित करताना शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी भाजपवर टीका करीत इंधन दर नियंत्रित करण्यात शासनाला अपयश आल्याने वाहतूक खर्चही वाढला. परिणामी महागाईत प्रचंड वाढ झाल्याचा आरोप केला. तर अस्लम शेख यांनी, करोनाकाळात नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद झाले परिणामी बेरोजगारी वाढली. मात्र केंद्र शासनाने याची काहीही दखल घेतली नसल्याचा आरोप केला. यावेळी माजी मंत्री व प्रदेश अध्यक्ष नसीम खान, नवी मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक, इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत, माजी उपमहापौर अविनाश लाड, रमाकांत म्हात्रे, वाशी अध्यक्ष सचिन नाईक व कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसने महागाईसारख्या गंभीर विषयावर आंदोलन केले असले तरी त्यात गांभीर्य दिसत नव्हते. आंदोलक सायकल आणि नेत्यांसोबत सेल्फी काढण्यातच मग्न दिसत होते. तसेच सामाजिक अंतर व मुखपट्टीचा काहींना विसर पडला होता. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर संसर्गजन्य रोग प्रतिबंधित कायदा व बेकायदा आंदोलनप्रकरणी गुन्हे दाखल केले असल्याची माहिती एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *