काळबादेवी इथल्या आगीत जखमी झालेला अग्निशमन दलाचा आणखी एक अधिकारी शहीद झाला आहे. सुनिल नेसरीकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. नेसरीकर यांच्यावर ऐरोलीतील बर्न सेंटर उपचार सुरु होते. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली.
काळबादेवी इथल्या गोकूळ निवास या इमारतीला 9 मे रोजी आग लागली होती. यामध्ये नेसरीकर हे 50 टक्के भाजले होते. त्यांची आज प्राणज्योत मालवली.
|
काळबादेवी अग्नितांडवात यापूर्वी संजय राणे, महेंद्र देसाई, सुधीर अमीन आणि आता सुनिल नेसरीकर यांचा मृत्यू झाला आहे.
ही आग विझवताना दोन जवानांना वीरमरण आलं होतं. तर दोन अधिकारी गंभीर जखमी झाले होते. उपमुख्य अधिकारी सुधीर अमीन हे 90 टक्के भाजले होते. त्यांचं 14 मे रोजी उपचारादरम्यान निधन झालं होतं.
नेसरीकरांची फायर फायटर अशी ओळख
गेल्या वर्षी अंधेरी येथील लोटस बिझनेस पार्कला लागलेल्या आगीमध्ये जवान नितीन इवलेकर यांचा मृत्यू झाला होता; तर अन्य 33 जवान अडकले होते. यामुळे अग्निशमन दलावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. तेव्हा तत्कालीन मुख्य अग्निशमन अधिकारी आदेश वर्मा यांना हटवून सुनील नेसरीकर यांच्याकडे कार्यभार सोपविण्यात आला होता.
लोटस पार्कमधील आग हाताळण्यात वर्मा यांनी कुचराई केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर तात्काळ प्रभारी अग्निशमन अधिकारी पदावर नेसरीकरांची नेमणूक करण्यात आली होती.
सुनील नेसरीकर हे स्वत: एक उत्तम फायर फायटर होते. आग विझविण्यासाठी ते स्वत: आघाडीवर काम करीत असे. अशी त्यांची ख्याती होती.
मुंबईतील एक जिगरबाज आणि मितभाषी अशी नेसरीकर यांची ओळख होती.